
विविध उद्योगधंदे, कारखान्यांत काम करणारे कामगार किंवा व्यक्तिगत काम करणारे कारागीर अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. मात्र, आपल्या व्यवसायातील कामात ते अतिशय कुशल असतात. त्यात प्रामुख्याने छोट्या-मोठ्या वर्कशॉपमध्ये काम करणारे टर्नर, मशिनिष्ट, गॅरेजमध्ये काम करणारे मेकॅनिक, सुतार, प्लंबर, बांधकाम कारागीर यांचा समावेश आहे. .
चंद्रपूर ः कौशल्य असूनही आर्थिक अडचणीमुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘आर्टिझन टू टेक्नोक्रॅट’ ही योजना काही वर्षांआधी सुरू केली. या माध्यमातून कारागिरांना तंत्रज्ञ करण्याचा हेतू होता. मात्र, या हेतूला जनजागृतीअभावी हरताळ फासला गेला. योजना सुरू झाल्यावर थोड्याबहुत युवकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर ही योजनाच थंडबस्त्यात पडून आहे.
विविध उद्योगधंदे, कारखान्यांत काम करणारे कामगार किंवा व्यक्तिगत काम करणारे कारागीर अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. मात्र, आपल्या व्यवसायातील कामात ते अतिशय कुशल असतात. त्यात प्रामुख्याने छोट्या-मोठ्या वर्कशॉपमध्ये काम करणारे टर्नर, मशिनिष्ट, गॅरेजमध्ये काम करणारे मेकॅनिक, सुतार, प्लंबर, बांधकाम कारागीर यांचा समावेश आहे. .
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
या कारागिरांकडे कुशलतेबाबतचे कोणतेही प्रमाणपत्र नसते. कौशल्य असूनही त्यांना अनेकदा कामे उपलब्ध होण्यास अडचणी येतात. पर्यायाने त्यांना पाहिजे तसे पैसे मिळत नाहीत. त्यांच्या उपजत कलागुणांना थोड्या प्रमाणावर प्रशिक्षणाद्वारे उजाळा देऊन त्यांच्या आवडत्या व्यवसायात, कौशल्यास पारंगत करण्याच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने १२ एप्रिल २००५ रोजी ‘आर्टिझन टू टेक्नोक्रॅट’ ही योजना सुरू केली. यातून कौशल्य असलेले पण पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता न येऊ शकलेल्यांना एक चांगली संधी विभागाने उपलब्ध करून दिली.
एका चांगल्या आणि रोजगारभिमूख योजनेबाबत जनजागृतीची गरज होती. सुरुवातीला थोड्याबहुत प्रमाणावर योजनेचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, नंतर योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ही योजना बंदच पडली.
या योजनेअंतर्गत प्रथमस्तरावरील आर्टिझनला टप्प्याटप्प्याने सिनिअर आर्टीझन, क्रॉफ्टसमॅन, मास्टर क्रॉफ्टमॅन, तंत्रज्ञ आणि शेवटी विशेष तज्ज्ञ बनण्याची संधी विभागाने उपलब्ध करून दिली होती. कारागिरांसाठी वय, शिक्षणाची अट नसलेली ही प्रशिक्षण योजना होती. यात कारागिराला अधिकच कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या लोकसेवा केंद्रात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हे प्रशिक्षण केलेल्यांना कौशल्यस्तराचे मान्यप्राप्त प्रमाणपत्र, संबंधित व्यवसायातील उच्चस्तरावरील कौशल्य प्राप्त करण्याची संधी, औद्योगिक आस्थापनांचा सहभाग असल्याने प्रमाणपत्र धारकांना कारखान्यात प्राधान्य, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार होत्या. मात्र, जनजागृतीअभावी ही योजना दुर्लक्षित राहिली.
मोजक्याच युवकांनी घेतले प्रशिक्षण
२००५ मध्ये ही योजना सुरू झाली. जिल्हास्तरावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘आर्टिझन टू टेक्नोक्रॅट’ योजनेची सुविधा होती. सुरुवातीला केवळ २५ ते ५० युवकांनी योजनेचा लाभ घेतला. त्यानंतर कुणीही या प्रशिक्षणाबाबत विचारणा करण्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे भटकले नाही.
संपादन - अथर्व महांकाळ