भाजपच्या काळातील घोषणा हवेत; अकोला-यवतमाळ येथील ‘सुपर स्पेशालिटी’ थंडबस्त्यात

केवल जीवनतारे
Wednesday, 3 February 2021

अकोला येथे २३८ खाटांचे तर यवतमाळ येथे २१० खाटांचे सुपर तयार करण्यात येणार होते, तसा आराखडा तयार होता. वैद्यकीय संचालनालयाकडे प्रस्ताव सादर झाला. मात्र, तो प्रस्ताव अद्यापही फाईलबंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर : दोन दशकांपासून नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर होते. हृदय, सीव्हीटीएस, नेफ्रोलॉजी आणि न्यूरॉलॉजी, मेंदूरोगावरील उपचारापुरते मर्यादित होते. परंतु, सुपरमध्ये दोन विषयात ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू झाले आणि संशोधन संस्थेचा दर्जा मिळण्याचे संकेत मिळाले. मात्र, पाच वर्षांपूर्वी अकोला आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी तयार करण्याची घोषणा केली होती. दोन्ही सुपर स्पेशालिटी पाच वर्षांपासून हवेतच असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

अकोला, वाशिम, बुलडाणा, खामगावपासून यवतमाळ, वणी, अमरावती परिसरातील ३० टक्के रुग्ण नागपुरातील मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीत उपचारासाठी येतात. अकोला आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाल्यास मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. या हेतूने अकोला-यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी तयार करण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली.

अकोला येथे २३८ खाटांचे तर यवतमाळ येथे २१० खाटांचे सुपर तयार करण्यात येणार होते, तसा आराखडा तयार होता. वैद्यकीय संचालनालयाकडे प्रस्ताव सादर झाला. मात्र, तो प्रस्ताव अद्यापही फाईलबंद असल्याची माहिती पुढे आली आहे. थेट सुपर स्पेशालिटी सुरू करण्यापेक्षा सुरवातीला ‘एमसीएच’, ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू करून या संस्थांना वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सूर काहींचा होता.

मात्र अकोला, यवतमाळ येथील ‘सुपर'ला प्रथम शैक्षणिक दर्जा मिळाल्यानंतर उपचाराचा दर्जा आपोआपच वाढणार होता. विद्यमान अधिष्ठातांनी परिश्रम घेतल्यास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार होतील, अशी माहिती आहे. दोन्ही सुपर स्पेशालिटीत हृदयरोग, सीव्हीटीएस, नेफ्रोलॉजी, युरॉलॉजी, न्यूरॉलॉजी हे विभाग तयार होणार आहेत, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती. 

विदर्भात चार सुपर स्पेशालिटी

नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत सध्या विदर्भासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून सुमारे तीस टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी आहे. नुकतेच आगामी काळात अकोला आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी तयार होत आहेत. विदर्भातील सरकारी यंत्रणेत चार ठिकाणी सुपर स्पेशालिटी तयार होतील. सर्वच आजारांवर विशेष उपचारासह डायलिसिसची सोय होणार असल्यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांसह हृदय, यकृत, मेंदूरोगावर योग्य उपचार मिळतील. सुपर स्पेशालिटी रुग्णालये विदर्भातील जनतेसाठी वरदान ठरतील, हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no super specialty in Akola Yavatmal yet