मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजवरील आदेशानंतरही पाण्याचे टँकर नाही! 

There is no water tanker even after order of Chief Minister Devendra Fadnavis
There is no water tanker even after order of Chief Minister Devendra Fadnavis

बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळामुळे होरपळत असलेली जनता आणि जनावरे मरणाच्या दारावर उभे आहे. दरवर्षीपेक्षा यंदाही कोसोदूर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावपातळीवर असलेल्या दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी दौरा न करता थेट सरपंच आणि ग्रामसेवकांसोबत संवाद साधण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

शुक्रवारी जिल्ह्याला वेळ देण्यात आली होती. परंतु, तांत्रिक दोषामुळे शनिवारी मुहूर्त निघाला. या संवादामध्ये मेहकर तालुक्यातील वरवंड या डोंगरमाथ्यावर असलेल्या गावातील पाण्याची अडचण सरपंचांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी 48 तासात यासंदर्भात कारवाई करून गावाला पुरेसे पाणी देण्यात यावे असे आदेशही दिले. परंतू, ऑडिओ ब्रीज तब्बल 48 तासांचा कालावधी उलटला तरी मात्र, गावात पाण्याचे वाढीव टँकर पोचलेच नाही. 

मेहकर तालुक्यातील वरवंड हे डोंगर माथ्यावर असलेले गाव... गावात पाण्याचा असा कायमस्वरुपी स्रोत नसल्यामुळे सर्व गावातील नागरिकांसह जनावरांची मदार ही टँकरवर. ग्रामपंचायत सरपंच संगीता संतोष साखरे यांच्यावतीने पाणी समस्या निवारणार्थ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर वरवंड गावाला शासनाच्या आदेशानुसार 82 हजार लिटरचे टँकर मंजूर करण्यात आले. परंतु, गावातील लोकसंख्या ही 2 हजार 210 इतकी असून, 1200 जनावरे आहे. यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीला माणसी 20 लिटर याप्रमाणे पाणी मिळणे गरजेचे आहे. सदर गाव हे डोंगराळ व घाटमाथ्यावर असल्यामुळे 22 हजार लिटर क्षमता असलेले टँकर दिवसभरात 3 फेर्‍या मारत केवळ 16 हजार लिटर प्रती फेरी पाणी पुरवठा करत आहे. त्यामुळे दिवसभरात 82 हजार लिटर पाण्याची गरज असताना केवळ 48 हजार लिटर मिळत आहे. याबाबत गावातील सरपंच पती संतोष साखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या ऑडिओ ब्रीज संवाद साधत समस्या मांडली असता, त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तत्काळ याबाबत समस्या निकाली काढून गावाला पूर्ण क्षमता असलेल्या टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश दिले. यावर प्रशासनाच्यावतीने येत्या 24 तासात ही समस्या निकाली काढण्यात येईल असे सांगितले होते. परंतु, आज (ता. 13) सकाळी 11 वाजेपर्यंतही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्यामुळे ऑडिओ ब्रीजनंतर 48 तास उलटलेच नाही का असा सवाल गावातील नागरिकांनी केला आहे. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री -
वरवंड येथील समस्येबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी तत्काळ गंभीर दखल घ्यायची आहे. क्षमता तसेच आदेशापेक्षा कमी पाणी का मिळते आहे यासंदर्भात तत्काळ कारवाई करून उद्यापासून योग्य तितके पाणी त्याठिकाणी मिळेल याची दक्षता येऊन तसा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करायचा आहे असे म्हटले तर, यावर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी गावातील पाणी टंचाईबाबत 24 तासात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

वाढीव टँकरच पर्याय -
वरवंड हे गाव घाटमाथ्यावर असून, टँकरची क्षमता जरी 22 हजार लिटरची असली तरी, ते गावात येण्यासाठी घाट चढावा लागत असल्यामुळे 16 हजार लिटरच्या वर पाणी भरल्यास अडचण निर्माण होते त्यामुळे, वाढीव टँकरने 34 हजार लिटरची तूट भरून काढणे हा पर्याय आहे. यासंदर्भात तहसीलदार मेहकर यांच्याकडे 2 मे पासून पाठपुरावा करण्यात येत असून, त्यांनी नवीन प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे द्या असे सांगितले होते. परंतु, टँकर सुरू असून, केवळ क्षमता पुरत नसल्याने वाढीव टँकर देण्याची मागणी सरपंचाच्या वतीने करण्यात आली होती. 

पाणी वाटपामध्येही घोळ -
मेहकर एसडीओ यांनी आदेशामध्ये 82 हजार लिटर पाणी देण्याचे सांगितले होते. गावाला पाणी पुरवठा करणारे टँकरची क्षमता 24 हजार लिटरची आहे. दिवसातून 3 फेर्‍या सदर टँकर तीन मारत असून, 16 हजार लिटर पाणी पुरवठा करते. त्यामुळे 48 हजार लिटर पाणी गावकर्‍यांना मिळत आहे. तर, 34 हजार लिटरची तूट पडत आहे. विशेष यामध्ये असे की, 22 हजार लिटरचे टँकरही म्हटले तर तीन फेर्‍यामध्ये 66 हजार लिटर पाणी होते. तर, उर्वरित 16 हजार लिटर पाणी कुठे मुरत आहे. याबाबत ग्रामपंचायतकडून पंचानामा व चालकाचा जबाब घेण्यात आला असून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

गावातील पाणी समस्यांचे बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय मांडला. त्यानंतर त्यांनी आदेश दिले. तत्काळ तहसीलदार यांचा फोन आला त्यांनीही समस्या जाणून घेतली. संध्याकाळपर्यंत टँकर मंजूर होऊन जाईल असे सांगितले. त्यानंतर आज (ता. 12) संध्याकाळपर्यंत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. कदाचित सुट्टी असल्याने विलंब लागत असेल परंतु, गावकर्‍यांना पाण्याची नितांत आवश्यकता असून, तत्काळ प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. - संतोष साखरे, सरपंच पती, वरवंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com