प्रत्येक "पराजया'मागे एक सत्य दडलेले असते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नागपूर :  कॉंग्रेसचा पराजय केवळ पक्ष विखुरलेला असल्याने झाला. परंतु, प्रत्येक पराजयामागे एक सत्य दडलेले असते. ते सत्य स्वीकारून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्रित यावे. संघाला 31 टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित 69 टक्के मतांबाबत आपण आशावादी राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (ता. 14) शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात त्यांनी लिहिलेल्या "देशाला काय हवे' या पुस्तिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुस्तिकेचे लोकार्पण झाले.

नागपूर :  कॉंग्रेसचा पराजय केवळ पक्ष विखुरलेला असल्याने झाला. परंतु, प्रत्येक पराजयामागे एक सत्य दडलेले असते. ते सत्य स्वीकारून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्रित यावे. संघाला 31 टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित 69 टक्के मतांबाबत आपण आशावादी राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (ता. 14) शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात त्यांनी लिहिलेल्या "देशाला काय हवे' या पुस्तिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुस्तिकेचे लोकार्पण झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल गुडधे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, श्रीपाद अपराजित, रमेश बोरकुटे, सागर खादीवाला उपस्थित होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. कुठल्याही युद्धाला किंवा हत्येला कडवेपणा कारणीभूत असतो. राजकारणात कडवेपणा शस्त्रापेक्षाही घातक असतो. कडवेपणा वाढणे म्हणजेच व्यक्तीचा, समाजाचा अंत होणे होय. कोणताही धर्म हिंसेच्या आरोपापासून मुक्त नाही. सद्यस्थितीत देशात संस्कृतीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण झाले आहे आणि ब्राह्मणीकरण संघाच्या जवळचे आहे. माणुसकी मुरावी लागते; परंतु जात, धर्म हे जन्मजात मिळाल्याने लोकांना जाती धर्माचा विचार लवकर जवळ आणतो. परंतु, मध्यमवर्गीयांनी मूल्यनिष्ठा जपावी व त्यासाठी कष्ट करावेत, असेही द्वादशीवार म्हणाले. कॉंग्रेसने विचाराने तर भाजपने श्रद्धेने लोकांना जोडले आहे. कॉंग्रेसच्या चुका झाल्या आणि त्या मान्य करीत त्यांची जबाबदारी आम्ही घेतो. भाजप जेव्हा जाती, धर्माचे विचार प्रसारित करीत होते तेव्हा आम्ही सत्तेत मग्न होतो. तिथेच आमची चूक झाली, याची कबुली आम्ही दिली पाहिजे, असे प्रफुल्ल गुडधे म्हणाले.राजकारणात विचारांना विवेकाची जोड असावी. जाती अंताची भाषणे करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात ते सर्वात कठीण कार्य आहे. यावर मात करायची असेल तर मोठा संघर्ष करावा लागेल, असे उल्दासदादा पवार यांनी सांगितले. श्रीपाद अपराजित यांनी धर्माचा वाटेल तसा अर्थ आपण घेत असतो; परंतु याचा सखोल विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.समाजाला, देशाला धर्मनिरपेक्षतेकडे न्यायचे असल्यास मूलभूत गोष्टींना भिडले पाहिजे, कॉंग्रेसने त्यांचा विचार मध्यमवर्गापर्यंत पोहोचविला पाहिजे, असे देवेंद्र गावंडे म्हणाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश गांधी यांनी "देशाला काय हवे' हे पुस्तक वाचून विचारशील मनुष्य अस्वस्थ होत असल्याचे सांगितले. संचालन रेखा दंडिगे यांनी केले. प्रास्ताविक अरुणा सबाने यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a truth hidden behind every "defeat"