
पुसद, (जि. यवतमाळ) : विधानसभा मतदारसंघातील शेवटच्या टोकावरचे माळवागद. पक्ष्यांची शिकार करून त्यांच्या विक्रीतून कशीबशी पोटाची खळगी भरणाऱ्या फासेपारधींच्या या गावची कथा आणि व्यथा वेगळीच. लॉकडाउनमुळे या भटक्या जमातीचा पक्षी विक्री व्यवसाय बंद पडलेला. मग, भाकरीचा चंद्र कसा मिळेल, याचीच त्यांना चिंता. या काळात काहीवेळा निर्जळी त्यांच्या नशिबी आली. अशावेळी व्हॉट्स ऍप ग्रुपने मने जुळलेले नवतरुण आदिवासी कर्मचारी फासे पारध्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी फासेपारधी बेड्यावर अन्नधान्य वाटप करून संकटसमयी मोलाचा आधार दिला.
पुसद येथील संदीप व्यवहारे या आदिवासी कर्मचाऱ्याने आदिवासी समाजाच्या नवीन कर्मचाऱ्यांमध्ये संवाद व एकी असावी यासाठी 'नवीन आदिवासी कर्मचारी 'व्हॉट्सऍप ग्रुप 2016 मध्ये सुरू केला. या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला. यंदा मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन झाले. त्यात अनेकांचे व्यवसाय आणि रोजगार बुडाले. अशा स्थितीत संदीप व्यवहारे यांनी ग्रुप ऍडमिन या नात्याने ग्रुपमधील आदिवासी कर्मचाऱ्यांना मदत कार्य करण्यासाठी आवाहन केले. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. ऍडमिनच्या बॅंक खात्यात ग्रुपच्या आदिवासी कर्मचारी बांधवांनी मदतीची रक्कम जमा केली. मोठी राशी जमा झाल्याने सर्वांचा उत्साह वाढला.
जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दैनिक 'सकाळ' मधून महागाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या माळवागद येथील फासेपारधी समाजाच्या व्यथा मांडण्यात आलेल्या होत्या. माळवागदचे सरपंच हे स्वतः फासेपारधी असून उदरनिर्वाहासाठी त्यांची सदैव भटकंती सुरू असते. कोरोनामुळे फासेपारधींची भटकंती थांबली आणि पोटाचा प्रश्न नव्याने निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन संदीप व्यवहारे यांच्या नेतृत्वात माळवागद गावची मदतीसाठी निवड केली. या भटक्यांच्या गावात फासेपारधींची 80 कुटुंब आहेत. त्यांना अन्नधान्य पुरविण्यासाठी 80 मदत किट्स तयार करण्यात आल्या.
नवीन आदिवासी कर्मचारी व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रससह महाराष्ट्रातील आदिवासी शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सदस्यांना ग्रुप ऍडमिन यांनी आवाहन केल्यानंतर मदतीचा पाऊस पडला. आलेली रक्कम खात्यात जमा करून अन्नधान्य खरेदी करण्यात आले. या अन्नधान्याच्या किट्स बनविण्यात आल्या. या तेल, मीठ, मिरची, हळद, मसाला आदी वस्तूंचा समावेश होता. मदतीचा ओघ पाहता सदस्यांचा हुरूप वाढला. या सदस्यांनी प्रत्यक्ष माळवागद येथे जाऊन फासेपारधी समाजाच्या कुटुंबप्रमुखांना अन्नधान्य किट्सचे नुकतेच वाटप केले. अनपेक्षित आलेल्या मदतीमुळे संकटात सापडलेल्या फासेपारधींना जगण्याची उब मिळाली. यावेळी मदत वाटप करताना 'सोशल डिस्टन्सिंगची' नियमावली तंतोतंत पाळण्यात आली. अन्नधान्याची कीट स्वीकारताना फासेपारधी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुटले. हा संवेदनशील प्रसंग अनुभवताना आदिवासी कर्मचारी ग्रुपचे सदस्य शिवाजी धनवे गणेश फोपसे, गोविंद धनवे, वासुदेव पवने, बीरसा ब्रिगेड संघटक पांडुरंग व्यवहारे, अशोक खंदारे, दत्ता खंदारे, गोपीनाथ झळके यांना क्षणभर गहिवरून आले. या अनपेक्षित मदतीबद्दल फासेपारधी बांधवांनी आदिवासी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
उपक्रमाचे सार्थक
आदिवासी म्हणून जीवन जगताना अनेक झळा सोसल्या. भटक्यांच्या जीवनाची खडतर वाटचाल पाहिली. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात फासेपारधींना मदतीचा हात देण्याची आवश्यकता वाटली. आम्ही 'नवतरुण आदिवासी कर्मचारी' या व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून माळवागदला ही मदत केली. फासेपारधींच्या चेहऱ्यावर समाधान पाहताना उपक्रमाचे सार्थक झाले.
-संदीप व्यवहारे, ऍडमिन, नवतरुण आदिवासी कर्मचारी व्हॉट्स ऍप ग्रुप.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.