esakal | अभिनंदनीय! तहसीलदारांसह चौघांनी स्विकारले मुलींच्या शिक्षणाचे दायित्व
sakal

बोलून बातमी शोधा

education

दरवर्षी दहावीच्या होतकरू विद्यार्थिनींची निवड या उपक्रमासाठी केली जाते. यावेळीसुद्धा दत्तक विद्यार्थी उपक्रमात दहावीच्या पाच मुलींची निवड करण्यात आली. यात तहसीलदारांसह चार व्यक्ती वर्षभर या मुलींचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.

अभिनंदनीय! तहसीलदारांसह चौघांनी स्विकारले मुलींच्या शिक्षणाचे दायित्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा) : शिकण्याची तळमळ असूनही अनेक गुणवंत विद्यार्थिनींना आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नाही. "लेक वाचवा आणि लेक शिकवा" अशा घोषणाही बरेचदा कुचकामी ठरतात. परंतु, महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव/देवी येथील दत्तक विद्यार्थी उपक्रमात निवड झालेल्या पाच मुलींच्या या वर्षीच्या शिक्षणाचे दायित्व तहसीलदार व इतर चार दातृत्वभाव जोपासणाऱ्यांनी स्वीकारले आहे.

या विद्यालयात दरवर्षी दहावीच्या होतकरू विद्यार्थिनींची निवड या उपक्रमासाठी केली जाते. यावेळीसुद्धा दत्तक विद्यार्थी उपक्रमात दहावीच्या पाच मुलींची निवड करण्यात आली. यात तहसीलदारांसह चार व्यक्ती वर्षभर या मुलींचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, मार्गदर्शिका व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे तहसीलदार देवदास बोंबर्डे, संस्था सचिव अजय शांडिल्य, मुख्याध्यापक राजकुमार बांते, ज्येष्ठ शिक्षक हंसराज भडके, श्रेयस शांडिल्य यांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार देवदास बोंबर्डे म्हणाले, परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण घेत नाहीत. परंतु, तुमचे ध्येय पक्के असेल, जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यास यशाचे शिखर गाठण्यास तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही.

यावेळी निवड झालेल्या रुचा झंझाड, पूनम शेंडे, छबीता भोयर, काजल बाभरे, रूनाली वैद्य यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. मोहाडीचे तहसीलदार देवदास बोंबर्डे, मौदा तहसीलचे नायब तहसीलदार नवनाथ कातकडे, मोहाडी पंचायत समितीचे अभियंता सुरेश मस्के, मुख्याध्यापक राजकुमार बांते, शाळेतील प्रयोगशाळा परिचर मोहन वाघमारे यांनी या शैक्षणिक सत्रासाठी मदत केली आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक हेमराज राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार हंसराज भडके यांनी मानले. कार्यक्रमासाठी गजानन वैद्य, गोपाल मडामे, शोभा कोचे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले.

 सविस्तर वाचा - ताई थांब जाऊ नको... स्वराजची शेवटची आर्त हाक

पाच वर्षांपासून उपक्रम
पाच वर्षांपासून विद्यालयात हा दत्तक योजना उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थिनींनी लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. मुलींना समान संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. शिक्षण हेच स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे म्हणून मुलींना दत्तक योजनेत समाविष्ट करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी सांगितले.


संपादन - स्वाती हुद्दार