bhandara.
bhandara.

महापुरात मातापित्यांचे छत्र हरवलेल्या अनाथ भावंडांना महिनाभरापासून सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा

लाखनी (जि.भंडारा) : ३० व ३१ ऑगस्ट रोजी वैनगंगेला आलेल्या महापुरात बुडून रत्नमाला कांबळे व रुपचंद कांबळे यांचा मृत्यू झाला होता. शासनाकडून त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात तत्काळ जमा करणे आवश्‍यक होते. पण ५ वारस असल्याने बॅंक संयुक्त खाते उघडण्यास तयार नाही. त्यामुळे चिमुकल्यांची महिनाभरापासून संयुक्त खात्यासाठी पायपीट सुरू आहे.

तालुक्‍यातील सिपेवाडा येथील रूपचंद कांबळे हे १५ ते २० वर्षांपूर्वी कामाच्या शोधार्थ भंडारा येथे गेले होते. टाकळी येथे झोपडीवजा घर तयार करून कुटुंबासह वास्तव्यास होते. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ऑगस्टच्या शेवटी संततधार पाऊस व अतिवृष्टीने तथा मध्य प्रदेशातील धरणातून पाण्याचा अत्याधिक विसर्ग केल्याने वैनगंगेला महापूर आला होता. त्यात रत्नमाला आणि रुपचंद कांबळे या पतिपत्नीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पाणी ओसरल्यानंतर उघडकीस आली होती. त्यामुळे दुर्गा (वय १७), सोनू (वय १४), मोनल (वय ११), अमित (वय ९) , संयोगी (वय ६) ही त्यांची अपत्य अनाथ झाली.

नैसर्गिक आपत्तीत सापडून मृत्यू झाल्यामुळे शासनाकडून मृत रुपचंद कांबळे यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळणे क्रमप्राप्त होते. तत्कालीन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी ८ लाख रुपये भरपाई देण्याची तयारी केली होती. पण वारस संख्या अधिक असल्याने कोणतीही राष्ट्रीयकृत बॅंक संयुक्त खाते उघडण्यास तयार नाही. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून या चिमुकल्यांची बॅंक खाते उघडण्यासाठी पायपीट सुरू आहे. तरीही संयुक्त बॅंक खाते काढले गेले नसल्याने ते सानुग्रह अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रवी मने, लाखनी तालुकाध्यक्ष सुनील कहालकर हे या चिमुकल्यांना सर्वतोपरी मदत करीत आहेत.

अशी आहे कायद्यात तरतूद
कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बॅंकेत जास्तीत जास्त ३ व्यक्तीचे संयुक्त खाते उघडले जाते. त्यापेक्षा वारसांची संख्या अधिक असेल तर न्यायालयाच्या आदेशाने ३ पेक्षा अधिक व्यक्तींचे संयुक्त बॅंक खाते उघडण्यात यावे, अशी कायद्यात तरतूद आहे.

प्रयत्न सुरू आहेत
रुपचंद कांबळे यांच्या वारसांना शासकीय मदत मिळावी. याकरिता प्रहार अपंग क्रांती संघटना भंडारा तालुका प्रशासनाच्या संपर्कात आहे. त्यांच्या सूचनेनुसार कांबळे यांच्या वारसांचे २ संयुक्त खाते काढून अनुदान रक्कम मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुनील कहालकर, तालुकाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना, लाखनी

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com