रहने को घर नही! हरवला त्यांचा निवारा

मुनेश्‍वर कुकडे
Friday, 11 September 2020

पांढरी येथील भोजराज मोतीराम पटले यांचे अतिवृष्टीमुळे घर पडून नुकसान झाले. राजेंद्र जीवन बिसेन यांचे घर २९ ऑगस्टला रात्री ९ च्या सुमारास डोळ्यादेखत कोसळले. त्यांनी रात्रीच पत्नी व मुलांना घेऊन रामभाऊ पटले यांच्या वऱ्हांड्यात आश्रय घेतला. मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तू पडलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली दबल्या.
 

सडक अर्जुनी (गोंदिया) :  पांढरी येथील दोन-तीन जणांची अतिवृष्टीमुळे मातीची घरे कोसळली. त्यामुळे कोणी प्लॅस्टिक आच्छादन टाकून बांबूच्या झोपडीत तर कोणी दुसऱ्याच्या घरी आश्रयाला गेले. असे असताना प्रशासनाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. ही कुटुंब गेले कित्येक वर्षे घरकुलापासून वंचित आहेत. आतातरी प्रशासनाने दखल घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल द्यावे, अशी मागणी होत आहे.

पांढरी येथील भोजराज मोतीराम पटले यांचे अतिवृष्टीमुळे घर पडून नुकसान झाले. राजेंद्र जीवन बिसेन यांचे घर २९ ऑगस्टला रात्री ९ च्या सुमारास डोळ्यादेखत कोसळले. त्यांनी रात्रीच पत्नी व मुलांना घेऊन रामभाऊ पटले यांच्या वऱ्हांड्यात आश्रय घेतला. मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तू पडलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली दबल्या.

सविस्तर वाचा - ऐकावे ते नवलच! चोरट्यांनी लुटले चक्क गॅस सिलिंडरचे गोदाम

यात त्यांचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले. त्यांना घरकुलाची नितांत गरज आहे. राजेंद्रचे भाऊ सोमेश्‍वर बिसेन यांचे घरसुद्धा राहण्यायोग्य नाही. ते कधीही कोसळू शकते. म्हणून तीन महिन्यांपूर्वीच घर सोडून ते गावातील शेखर उमराव अंबुले यांच्या घरी भाड्याने राहत आहेत. राजेंद्र व सोमेश्‍वर यांची वृद्ध आई सुमन बिसेन (वय ७०) स्वत:च्या झोपडीत राहत आहेत. पाऊस आला की झोपडीच्या चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडतो. पुष्पा मुलचंद कटरे यांच्या पतीचे १९९८ मध्ये निधन झाले. तेव्हापासून एका पडलेल्या घराच्या वऱ्हांड्यात त्या जीवन जगत आहेत. परंतु, त्यांना अजूनपर्यंत घरकुल मिळाले नाही.

विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल देण्यासाठी शासन कटिबद्ध असून याची अंमलबजावणी करण्यासाठी नगरविकास व ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयात जी.आर.ची विसंगती आहे. तीन वर्षे लोटूनही या योजनेला गती मिळाली नाही.त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अडचणी येत आहेत. वास्तविक दोन-तीन पिढ्‌या ज्या घरात गेले ती घरे जीर्ण होऊन पडत आहेत. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत पदाधिकारी चर्चा करून घरकुल लाभार्थ्यांचे नाव वाचून मोकळे होतात. मात्र, त्यानंतर खऱ्या गरजूंना डावलून गरज नसलेल्यांना घरकुल देतात. हा प्रकार थांबावा. खऱ्या गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

घरकुल नाही
८ ते १० वर्षांपासून मी घरकुलाची मागणी करीत आहे. याकरिता ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिजविल्या. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बदलले. परंतु, घरकुल मिळाले नाही. आमच्यासारख्या गरजूंना घरकुलापासून डावलले जात आहे.
राजेंद्र बिसेन, पीडित लाभार्थी, पांढरी

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They have no home