दोघांमध्ये बिनसले आणि केला तिच्यावर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

पवन व करिष्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. कौंटुबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि करिष्मा गेल्या सहा महिन्यांपासून कन्हाळमोह येथे आपल्या मोठ्या आईकडे राहत होती. त्यामुळे पती-पत्नीमधील संबंध आणखी ताणले गेले.

भंडारा : कौटुंबिक कलहामुळे सहा महिन्यांपासून माहेरच्या नातेवाईकाकडे वास्तव्यास असलेल्या विवाहितेवर संतापलेल्या पतीने देशी कट्ट्यातून गोळीबार केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता.11) दुपारी चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह येथे घडली. 

कौंटुबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद 

पवन नागसेन गजभिये (वय 30) असे हल्लेखोर पतीचे तर करिष्मा गजभिये (वय 25) असे जखमी पत्नीचे नाव आहे. पवन हा परसोडी (जवाहरनगर) येथील रहिवासी आहे. पवन व करिष्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. कौंटुबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि करिष्मा गेल्या सहा महिन्यांपासून कन्हाळमोह येथे आपल्या मोठ्या आईकडे राहत होती. त्यामुळे पती-पत्नीमधील संबंध आणखी ताणले गेले. गाठीभेटीही बंद झाल्या. त्यामुळे पवन सतत तणावात असायचा. 

हेही वाचा- चुलत भावांचा वाद गेला विकोपाला, नंतर घडले असे... 

रागाच्या भरात पवनने केला गोळीबार

शनिवारी तो करिष्माला भेटण्यासाठी कन्हाळमोह येथे गेला. परंतु, करिष्माने त्याला भेटण्यास नकार दिला. दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पवनने त्याच्याकडे असलेल्या देशीकट्ट्यातून करिष्माच्या पोटावर गोळ्या झाडल्या. करिष्मा रक्ताच्या थारोळ्यात पडली. 

करिष्मावर नागपुरात उपचार 

गंभीर जखमी करिष्माला नातेवाईकांनी लगेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतु, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने लगेच नागपूर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारधा ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे व चमू कन्हाळमोह येथे दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून चौकशी सुरू केली. आरोपी पवन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They quarreled and he fired at her