पोलिस कर्मचाऱ्यांची बंदोबस्त परीक्षा सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः गणेशोत्सवाच्या बंदोबस्तानंतर आता पोलिस नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव, निवडणुका, विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्ताची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताच्या ओझ्याखाली चांगलेच पिचल्या जात आहेत.

गणेशोत्सवापासून ते डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनपर्यंत पोलिस सुरक्षेसाठी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. गणेशोत्सवाचा बंदोबस्तात पोलिस कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल ओतून यशस्वी केला. यादरम्यान मुस्लिम बांधवाचा मोहरम सणाचाही बंदोबस्त होता. त्यानिमित्त शहरातून रॅली आणि जुलूस-उर्स निघाले. त्यामुळे पुन्हा बंदोबस्तावर भर देण्यात आला होता. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर लगेच 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी पुन्हा 15 दिवसांचा डोळ्यात तेल टाकून पोलिस कर्मचारी रात्रंदिन रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात आठ तारखेला दसरा येत आहे. त्यासाठी शहरात दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी असते. त्यासाठी रस्त्यावर पोलिस बंदोबस्त असतो. त्यानंतर ऑक्‍टोबर शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक आहेत. त्यामुळे जवळपास आठवडाभर पोलिस कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असणार आहेत. यादरम्यान मतदान केंद्र, पैशांची देवाण-घेवाण यासह दारू आणि पैसे वाटप यावरही पोलिसांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यानंतर लगेच दिवाळी सण सामान्य नागरिकांनी मोठ्या उत्सवात साजरा करता यावा, यासाठी शहरात दिव्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेची ज्योत पोलिस तेवत ठेवत असतात. शेवटी डिसेंबरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक कठीण असलेला हिवाळी अधिवेशन बंदोबस्त नागपूर पोलिसांच्या डोक्‍यावर येऊन बसणार आहे. अधिवेशनादरम्यान संपूर्ण मंत्रिमंडळ नागपुरात ठाण मांडते. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारापर्यंतची सर्वच दारोमदार नागपुरात उपस्थित असते. अधिवेशनादरम्यान शासनाला जाब विचारण्यासाठी नागरिक व संघटना समस्यांना घेऊन मोर्चे काढतात. शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कटून जाते. पोलिसांना रस्त्यावरच जेवण आणि पाण्याची सोय पोलिस आयुक्‍तालयाकडून केली जाते. महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा घडीभराची उसंत हिवाळी अधिवेशन बंदोबस्तात नसते. त्यामुळे येणारे तीन महिन्यांचा कालावधी हा पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा घेणारा आहे.
कुटुंबीयांची चिडचिड
सतत तीन महिने बंदोबस्ताचा पोलिसांच्या कुटुंबावरही परिणाम जाणवतो. घरातील अनेक महत्त्वाची कामे लांबणीवर पडतात. या दरम्यान घरातील किंवा नातेवाइकांकडील सणासुदीला कुटुंबीयांसोबत जाणे शक्‍य होत नाही. परिणामतः बंदोबस्तामुळे घरात ताणतणाव वाढतात. तसेच वेळ न दिल्यामुळे नातेवाईकही नाराज होतात.
मुलांच्या आनंदावर विरजण
बंदोबस्ताच्या तीन महिन्यांच्या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ इत्यादी महत्त्वाचे सण येतात. पोलिसांच्या मुलांना यादरम्यान वडिलांसोबत मौजमजा करण्यासाठी बाहेर जाता येत नाही. बंदोबस्तामुळे वडील किंवा आई बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे मुलांना कुठेही जाता येत नाही. त्यामुळे मुलांच्याही आनंदावर विरजण पडते.
आजाराकडे दुर्लक्ष
बंदोबस्तात साप्ताहिक रजा किंवा सर्वच प्रकारच्या रजा बंद करण्यात येतात. सतत बंदोबस्तात असल्याचा परिणाम आरोग्यावर पडतो. दवाखान्यातसुद्धा जायला पोलिस कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही. बंदोबस्तामुळे ते अंगावर आजार काढतात. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न पोलिसांना नेहमीच भेडसावतो. मात्र, बंदोबस्तामुळे तेसुद्धा पोलिस कर्मचारी सहन करतात.
भावना समजून घ्या
पोलिस कर्मचारी बंदोबस्तात जवळपास 16 ते 18 तास सतत उभे असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या भावना जाणून घ्याव्या. त्यांच्या कर्तव्याची आणि कार्याची जाण ठेवावी. पोलिस कर्मचारीसुद्धा आपल्यासारखाचा माणूस आहे, अशी भावना मनात ठेवून मदतीचा आणि सहकार्याचा हात पुढे करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com