esakal | विदर्भातील हजारो महिलांनी केले वैनगंगेत पवित्रस्नान 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

विदर्भातील हजारो महिलांनी केले वैनगंगेत पवित्रस्नान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पवनी (जि. भंडारा) : दक्षिण विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या पवनी शहरात वैनगंगेच्या वैजेश्‍वर घाटावर आज, मंगळवारी ऋषीपंचमीला हजारोंच्या संख्येने महिलांनी पवित्रस्नान केले. यावेळी वैनगंगा दुथडी भरून वाहत असल्याने अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक ढिवर बांधव तैनात होते. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत हजारो महिलांनी ऋषीपंचमीनिमित पवित्रस्नान केले. सकाळी 5 वाजेपासून घाटावर महिलांनी पवित्रस्नानासाठी गर्दी केली होती. दुपारी घाटापासून तर मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. जिल्ह्यातील आंबोरा घाट धरणाच्या पाण्याखाली आल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात महिला पवनी नगरीत पवित्र स्नानासाठी आल्याने गर्दी उसळली होती. 
ऋषीपंचमीला भाद्रपद महिन्यातील पंचमीला दरवर्षी हे व्रत केले जाते. रजोनिवृत्त झालेल्या महिला हे व्रत करतात. व्रतस्थ महिलांनी नदीवर जावून आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठाने दंतधावन करावे, आवळकाठी व तिष्ठ वाटून स्नान करून वस्त्र परिधान करावे. अरुंधतीसह सात ऋषींची पूजा करावी, असे हे व्रत असून बैलांच्या परिश्रमाशिवाय उत्पादित धान्य व पालेभाज्यांचा स्वयंपाक येथे केला जातो. यात प्रामुख्याने देवतांदळाचा समावेश असतो. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातून पवित्र वैनगंगा नदीकाठावरील वैजेश्वर मंदिर व घाटावर दुपारपर्यंत हजारो महिलांनी पवित्र स्नानासाठी हजेरी लावली होती. 
 

loading image
go to top