नागपूर : अश्‍लील चाळे करून बलात्काराची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

युवतीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीने कारागृहातून जामिनावर सुटताच युवतीचे घर गाठले. पोलिस ठाण्यात केलेली तक्रार परत घेण्यास तिच्यावर दबाव टाकला. तसेच लहान बहिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली

नागपूर - युवतीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीने कारागृहातून जामिनावर सुटताच युवतीचे घर गाठले. पोलिस ठाण्यात केलेली तक्रार परत घेण्यास तिच्यावर दबाव टाकला. तसेच लहान बहिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. करण कांबळे (वय २२, रा. एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण कांबळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. वस्तीत बदनाम असलेल्या करणशी पीडित १७ वर्षीय तरुणीचे सूत जुळले. दोघांचेही प्रेमसंबंध वस्तीत चर्चित होते. त्याची कुणकुण तरुणीच्या आई-वडिलांना लागली. त्यामुळे त्यांनी करणची समजूत घालून मुलीच्या दूर राहण्यास सांगितले. मात्र, करणने उलट तिच्या आई-वडिलांना पाहून घेण्याची धमकी दिली. 

गेल्या सहा महिन्यांपूर्वी तरुणीला फुटाळा तलावावर भेटायला बोलावले. तरुणी आल्यानंतर त्याने वाद घातला. लग्न करण्याची मागणी केली. तिने लग्नास नकार दिल्याने करणने अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तिचे अपहरण केले. जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कार केला. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटून ती घरी परतली. तिच्या अवस्थेवरून आई-वडिलांना काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. तिची आस्थेने विचारपूस केल्यानंतर करणने केलेल्या बलात्काराला वाचा फुटली. पालकांनी अंबाझरी पोलिसांत तक्रार केली. 

अंबाझरी पोलिसांनी करण कांबळेविरुद्ध अपहरण करून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला व अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून तो मध्यवर्ती कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर सुटला.

रस्त्यात अडवून दिली धमकी
१७ सप्टेंबरला दुपारी दीड वाजता पीडित तरुणी वस्तीतील मेडिकल स्टोअर्समध्ये औषध आणायला जात होती. दरम्यान, करणने तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवले. तिला पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. तसेच तिच्या १६ वर्षांच्या लहान बहिणीवर बलात्कार करण्याची धमकी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threats of kidnapping and raping her in nagpur