यवतमाळ जिल्ह्यातील सोनबर्डीत तिघांना किडनीचा आजार...फ्लोराईडयुक्त पाण्याचा फटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

सध्याच्या परिस्थितीत सोनबर्डी गावातील सहा हातपंप सुरू असून, याद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. हातपंपांमधून येणारे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने गावातील महिला, पुरुष व मुलांना किडनीचे आजार जडत आहेत.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने तालुक्‍यातील सोनबर्डी या गावातील तिघांना किडनीचा आजार जडला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तालुक्‍यातील सोनबर्डी गावातील लोकसंख्या जवळपास सोळाशेच्या आसपास आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावामध्ये नळयोजना कार्यान्वित झाली नाही. त्याचा विपरीत परिणाम म्हणून गावकऱ्यांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. मात्र, तरीदेखील पांढरकवडा येथील पंचायत समिती प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत सोनबर्डी गावातील सहा हातपंप सुरू असून, याद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. हातपंपांमधून येणारे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने गावातील महिला, पुरुष व मुलांना किडनीचे आजार जडत आहेत.

हातपंपाचे पाणी फ्लोराईडयुक्त

हातपंपांवर मुबलक प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नसून, साफसफाईअभावी सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसून येत आहे. संबंधित ग्रामसेवक फार क्वचितच गावामध्ये येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या कोणत्याही समस्या निकाली लागत नाहीत. हातपंपांवरील दूषित पाणी पिल्याने चार दिवसांपूर्वी गावातील दोन महिला व एका पुरुषाला किडनीचे आजार उत्पन्न झाले आहेत. प्रकृती खालावल्यामुळे या तिघांना उपचारासाठी तत्काळ यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सोनबर्डी गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना सुरूच झाली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जाणून घ्या : सलून व्यावसायिक करणार माझे दुकान, माझी मागणी आंदोलन

वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज

सोनबर्डी या गावातील तिघांना किडनीचा आजार जडल्याने त्यांना तत्काळ यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत संबंधित लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांनी या गावातील पाणीटंचाईकडे दुर्लक्षच केलेले आहे. त्याचाच विपरीत परिणाम म्हणून या गावातील ग्रामस्थांना आज या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून आतातरी या भागातील लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणेतील संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत गांभीर्याने दखल घेतील का, असा प्रश्‍नही यानिमित्ताने ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three have kidney disease in Sonbardi