
कमी भावात सोने खरेदी करण्याचा सौदा ठरल्यानुसार एका व्यक्ती आपल्या कारने निघाला. मात्र दुचाकीवर आलेल्या चौघांनी पोलिस असल्याची बतावणी करीत रोख तीन लाख रुपयांसह सोने असलेली थैली काढून घेतली. ही घटना सावळी सदोबा ते घोटी रोडवरील मंदिराजवळ शुक्रवारी (ता. पाच) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील उमरी येथील शेख बाबा शेख मेहबूब कुरेशी (वय 64) यांना शेतात नाल्याच्या बंधाऱ्याचे बांधकाम करावयाचे असल्याने गेल्या 22 दिवसांपूर्वी त्यांनी हरिदास कुचनकर याला फोनद्वारे बोलावून घेतले. बोलणीनुसार बंधाऱ्याचा ठेका ठरवून दिला.
कुचनकरसोबत असलेल्या भय्याजी कोहचाडे याने शेख बाबा यांना माझ्या मित्राने जमिनीतून सोने काढले आहे. ते कमी भावात मिळवून देतो, असे आमिष दाखविले.
सौदा करण्यापूर्वी सात सोन्याचे क्वॉइन दाखवून एक पाव सोन्याची किमत तीन लाख रुपये ठरविली. त्यानुसार शुक्रवारी कुचनकर, शेख बाबा व त्यांचा जावई असे तिघे चारचाकी वाहनाने सावळी सदोबा येथील आयटीआय कॉलेजजवळ थांबले. कैलास ऊर्फ करण चव्हाण (वय 40) व भीमराव या दोघांनी त्यांना पैसे घेऊन मंदिराकडे येण्यास सांगितले.
त्यावेळी दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी आम्ही पोलिस आहोत, अशी खोटी बतावणी केली. सोने असलेली लाल रंगाची थैली घेतली. कुचनकर यांच्या शर्टाच्या पन्नीत ठेवलेले तीन लाख रुपये काढून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. कमी भावात सोने देण्याचे आमिष दाखवून शेख बाबा यंची फसवणूक करण्यात आली.
हेही वाचा : कौटुंबिक कलहातून तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल
ही घटना घडल्यावर शेख बाबा शेख मेहबूब कुरेशी यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कैलास चव्हाण, भीमराव यांच्यासह अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक माहितीसाठी ठाणेदार गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.