अरे बापरे! शेताच्या धुर्‍याचा वाद असा काय पेटला अन् त्यांनी युवकावर विळ्याने सपासप...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

पारंपारिकरित्या शेत जमिनी वडिलोपार्जीत मुलांच्या नावावर वाटल्या जात आहे. मोठ्या संख्येने असलेली शेतजमिनी आता तुकड्यात झाली आहे. यामध्ये आता शेतजमिनीच्या धुऱ्याचे वादही वाढले आहे.

मानोरा (जि.वाशीम) : शेत जमिनीच्या धुर्‍यावरील दगड सरकविल्याच्या कारणावरून, युवकावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता.9) येथून जवळच असलेल्या धामणी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर रविवारी (ता.10) या घटनेतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष विश्वनाथ पवार (रा. सोमठाना, मानोरा) हे धामणी शेतशिवारात असलेल्या शेताकडे जात होता. यावेळी तुकाराम धारपवार, मंगेश धारपवार, नागेश धारपवार यांनी त्यांचा रस्ता अडविला. तसेच शेताच्या धुर्‍यावरील दगड कोणी सरकविल्याबाबत विचारणा केली. मात्र, याबाबत फिर्यादीने कल्पना नसल्याचे सांगितेल. मात्र, त्यानंतर संबंधितांनी शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी दिली. तर दोघांनी हात धरून एकाने हाती असलेल्या विळ्याने छातीवर वार केला. 

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन लाॅक, तीन हजारावर शिक्षक वेतनाविना

मात्र, पहिला वार खिशात असलेल्या मोबाईलला लागला. त्यामुळे मोबाईल तुटला गेला. तर दुसरा वार छातीवर लागल्यामुळे गंभीर इजा झाली. अशा फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसानी संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच रविवारी (ता.10) उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, पोलिस निरीक्षक शिशीर मानकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच तिघांना अटक केली आहे. जखमीवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सविता वड्डे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three man attack on youth in washim district