अनिकेत आमटे यांचा अतिदुर्गम गावांत जाण्याचा थरारक अनुभव, वाचा सविस्तर...

अनिकेत आमटे
Sunday, 14 June 2020

अनिकेत आमटे हे नाव महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचयाचे आहे. प्रकाश बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळताना अनिकेत आमटे यांनी भामरागड परिसरात शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत हाती घेतले. गावागावातील बालके शिकायला हवीत या उद्देशाने अनिकेत आमटे यांचे कार्य सुरू आहे. `भामरागडच्या नोंदी' या लेखमालेतून त्यांनी `सकाळ'मध्ये स्तंभलेखनही सुरू केले. अशाच अतिदुर्गम भागात जाण्याचा त्यांचा हा अनुभव..

गडचिरोली : भामरागड तालुक्‍यात अनेक दुर्गम आदिवासी पाडी आहेत जेथे आपण पावसाळ्यात जाऊच शकत नाही. हा परिसर घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, ओढे-नाले, मोठमोठ्या नद्यांनी वेढलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. दरवर्षी पाऊस या भागात 90 ते 100 इंच एवढा पडतो. त्यामुळे नद्या-नाल्यांना अनेकदा पूर येत असतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आम्ही अतिदुर्गम गावांना भेटी देत असतो. अशाच एका अतिदुर्गम गावात जाण्याचा योग यावर्षी आला.

कोपर्शी नावाचे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील परिसरातील गाव. या गावात आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. भामरागड तालुक्‍याच्या ठिकाणापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर लांब हे गाव आहे. जाताना वाटेत आरेवाडा, हिदूर, डोबूर, पोयरकोठी, गुंडूरवाही, फुलणार आणि मगकोपर्शी. भामरागड ते आरेवाडा साधारण 3 किलोमीटर डांबरी रस्ता आहे. नंतर पुढे गुंडूरवाहीपर्यंत कच्चा रस्ता. पुढे रस्ता माहिती नाही म्हणून गुंडूरवाही येथून आमच्या शाळेत शिकणाऱ्या अशोक नावाच्या मुलाला आणि त्याच्या दोन मित्रांना सोबत गाडीत घेतले.

गुंडूरवाहीपासून फुलणार साधारण 4 किलोमीटर आणि पुढे कोपर्शी 4 किलोमीटर. शेवटचे 8 किलोमीटर रस्ता नाहीच. बैलगाडी जाईल असा मार्ग. सभोवताली घनदाट अरण्य. वाटेत अनेक ओढे लागलेत मोठाले. टाटा सफारी गाडीने प्रवास सुरू होता. मोठमोठाले ओढ्यातील दगड गाडीला खाली लागलेत. गाडीचे हाल झाले. गाडी नेण्याचे कारण काही वस्तू, मच्छरदाण्या व कपडे वाटप करायचे होते.

क्लिक करा - रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

पहिले फुलणार गाव लागले. अगदी पर्लकोटा नदीच्या पात्राला खेटून हे गाव आहे. या गावात फक्त 4 घरे आहेत. साधारण 25 लोकसंख्या. सर्व माडिया समाजातील आदिवासीबांधव या भागात वास्तव्यास आहेत. आम्ही थांबलो फुलणार गावात. पर्लकोटा नदीच्या पात्रात 8-9 छोटी-छोटी मुलं मनसोक्त डुंबत होती. मी, समीक्षा (माझी पत्नी) आणि आमच्या शाळेचे अधीक्षक अशोक चापले सोबत होते. पेशंट म्हणून या गावातील जनता लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात येऊन गेली होती. पण, या फुलणार आणि कोपर्शी गावातील एकही मुलगा अथवा मुलगी आमच्या शाळेत शिकायला नव्हते. म्हणून आम्ही परिस्थिती बघायला गेलो होतो.

दुर्गम गावातील मुले-मुली शिकावीत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असतो. गावात थांबून चौकशी केली. कोणीच त्या दोन गावांत फार काही शिकलेले नाही, असे कळले. गावात मुलं बरीच दिसलीत. त्यातील 6 वर्षांच्या मुला-मुलींना यावर्षी शाळेत घेऊन या, असे पालकांना सांगितले. शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेतून समजावून सांगितले. या गावातील मुला-मुलींचे काहींचे जन्मदाखले नाहीत. तर काहींचे आधारकार्ड नाहीत. अवघड आहे परिस्थिती. बाळ जन्मल्यावर काहींनी अंगणवाडीत नोंद केल्याचे कळले. अशा दुर्गम भागात प्रसुती घरीच होत असते.

हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

आदिवासी पाडे आणि त्यांची घरे मातीची असतात आणि अतिशय छान सारवलेली व स्वच्छ असतात. या गावात नदी खेटून वाहत असल्याने त्यांनी वांगी लावली होती आणि त्या झाडांना उत्तम वांगी लागलेली होती. हे बघण्यात सुख होतं. 4 कुटुंबे मिळून एका प्लॉटमध्ये त्यांनी उन्हाळ्यात वांगी पिकवली होती. 30 रुपये किलोने आम्ही 4 किलो वांगी विकत घेतली. गाडीत सोबत नेलेले सामान वाटप केले. एका वृद्ध स्त्रीला मच्छरदाणी आणि नवीन कोरी साडी दिली. ती घेऊन घरी गेली आणि लगेच वापस आली. येताना हातात ओंजळीमध्ये सुकवलेले मासे आमच्यासाठी घेऊन आली. आम्ही कोणीही मासे खात नाही, असे सांगितल्यावर ती म्हणाली माझ्याकडे दुसरे काही नाही द्यायला. आम्ही म्हणालो, आम्हाला काहीही नकोय. या भागात नदीत मासेमारी नेहमीच चालत असते.

पुढे कोपर्शीला जायला निघालो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर आला होता तेव्हा हे गाव पूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यावेळी आम्हाला या गावात प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवता आली नाही. पण, महापुरानंतर लगेच 2-3 दिवसांत आम्ही त्यांच्यासाठी जीवनावश्‍यक मदत गुंडूरवाही या गावात पोहोचवून दिली होती. तेथून गावातील काही मंडळींनी ती मदत पुढील पूरग्रस्त गावात चालत पोहोचवून दिली. फुलणारनंतरची वाट अजूनच बिकट होती. पूर येऊन गेल्याने अनेक वृक्ष मुळासकट कोसळली होती. खूप सारा कचरा रस्त्यावर आणि झाडाझुडपांवर अडकलेला दिसत होता. त्यावरून पुराचा अंदाज येत होता.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

हे गाव एका मोठ्या ओढ्याच्या आणि पर्लकोटा नदीच्या अगदी संगमावर वसलेले आहे. त्यामुळे पुराचा तडाखा जबर बसला होता. हे गाव पण छोटेसे 6 घरांचे आहे. येथील लोकसंख्या साधारण 38 असल्याचे कळले. या गावातील एक व्यक्ती 8 वा वर्ग शिकलाय. पण, आता तो सर्व विसरला आहे. लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलंसुद्धा आहेत. शाळा मध्येच सोडल्याचा त्याला आता पश्‍चात्ताप झाल्याचे तो सांगत होता. गावातील 2 विद्यार्थी कोठी गावातील शासकीय आश्रमशाळेत शिकत असल्याचे कळले.

काही वर्षांपूर्वी या गावातील 2 विद्यार्थी लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकायला होते. पण त्यांनी मध्येच शाळा सोडली. शाळेत करमत नव्हते त्यांना. पण, आता काही पालकांना समजावून सांगितले आहे. आणि ते त्यांच्या मुलांना व मुलींना शिकवायला तयार झाले आहेत. यावर्षी शाळा सुरू होईल तेव्हा या गावातील काही 2-3 विद्यार्थी तरी आपल्या शाळेत प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा पावसाळा जवळ आला म्हणून काही जण घरांची (झोपडीची) डागडुजी करीत होते, तर काही जण नवीन घर (झोपडी) बांधत होते. काहींनी नवीन बांबू आणि लाकडांचे झोपडीला कुंपण घालण्याचे काम हाती घेतले होते. महिला पानांच्या पत्रावळ्या करीत बसल्या होत्या. काही महिला मातीने घर सारवण्याचे काम करीत होत्या.

या गावांमध्ये जाण्याचा अनुभव हा थरारक होता. लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकून आता तलाठी म्हणून काम करणाऱ्या मल्लमपोडूर गावचा किशोर वड्डे याने केलेल्या विनंतीवरून आम्ही या गावांना भेटी देऊन आलो. या मुलांना संधी द्या, असे काही माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. बघूया शाळा सुरू झाली की, किती विद्यार्थी प्रवेश घेतात ते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thrilling experience of Aniket Amte to trvell in interior village