रात्री पिकांना पाणी देताना वाघ आला धावून, मचाणीवर चढल्याने वाचला जीव

सतीश पुल्लजवार
Saturday, 13 February 2021

गुरुवारी (ता.11) दिवसभर शेतीची कामे पूर्ण करून रात्रीला पिकांची निगा राखण्यासाठी इंद्रदेव व त्यांचा सहकारी दिनेश हे दोघेजण पिकांना पाणी देत होते. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्या दोघांवर हल्ला केला.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : शेतात रात्री पिकांना पाणी देत असताना अचानकपणे वाघाने हल्ला करून दोन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. मात्र, दैव बलवत्तर होते म्हणून मचाणीवर चढल्याने या दोघांनाही जीवदान मिळाले. ही घटना गुरुवारी (ता.11) रात्री झरी जामणी तालुक्‍यातील जुनोनी शेतशिवारात घडली.

हेही वाचा - कोरोनाचा धोका वाढतोय! बाधितांच्या संपर्कात आल्यास करा चाचणी, अन्यथा संपूर्ण सोसायटी विलगीकरणात

इंद्रदेव किनाके (वय 35, रा. मांडवी ता. झरी जामणी) व दिनेश मडावी (वय 35, रा. धारणा ता. केळापुर) असे जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे असून, पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. झरी जामणी तालुक्‍यातील जुनोनी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून वाघांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी वर्गात कमालीची दहशत पसरली आहे. इंद्रदेव किनाके यांच्या मालकीची मांडवी येथील शेतशिवारामध्ये शेती आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.11) दिवसभर शेतीची कामे पूर्ण करून रात्रीला पिकांची निगा राखण्यासाठी इंद्रदेव व त्यांचा सहकारी दिनेश हे दोघेजण पिकांना पाणी देत होते. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्या दोघांवर हल्ला केला. काही कळायच्या आताच वाघाने इंद्रदेव याच्या मानेवर व दिनेश याला मांडीवर पंजे मारून गंभीररीत्या जख्मी केले. वाघाच्या तावडीतून कसीबसी सुटका करून मचाणीवर चढल्याने त्या दोघांचा जीव वाचला. गावकऱ्यांनी त्या दोघांना उपचारासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील इंद्रदेव याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्या दोघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger attack on two farmers in pandharkawada of yavatmal