पाच जणांचा बळी घेणाऱ्या "केटी 1'चा मृत्यू संसर्गामुळेच 

A tiger in Chandrapur died due to infection
A tiger in Chandrapur died due to infection
Updated on

नागपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या कोलारा परिसरात पाच जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा (के टी 1) गोरेवाडा बचाव केंद्रात क्वॉरंटाइन असताना मृत्यू झाला. आज सकाळी वाघाच्या मृत्यू माहिती पुढे येता वनविभागात खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर आलेल्या प्राथमिक अहवालानुसार वाघाचा मृत्यू संसर्गामुळे झाल्याचे उघड झाले आहे. प्रयोगशाळेच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मूळ कारण स्पष्ट होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

ताडोबा प्रकल्पाच्या कोलारा प्रवेशद्वारालगत असलेल्या जंगलात गावकरी सरपण आणि तेंदूपाने गोळा करण्यासाठी जात असतात. यातूनच वाघाचे हल्ले झाले होते. सलग चार महिन्यांत पाच जणांचे बळी घेतल्याने त्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिले होते. त्यानुसार वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने त्याला 10 जून रोजी जेरबंद केले होते. त्यानंतर त्याला 11 जूनला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले. 

प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला क्वॉरंटाइन केले होते. दरम्यान, त्याच वाघाचा मृत्यू झाला. गोरेवाड्यात आणल्यापासूनच हा वाघ अतिशय आक्रमक होता. येथे आल्यानंतर सलग तीन दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. गेल्या आठ दिवसांपासून मांस खाण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी गोरेवाड्यातील कर्मचारी त्या वाघाच्या पिंजऱ्याजवळ गेले. दरम्यान, के.टी. 1 वाघ हा हालचाल करीत नसल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी ती माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. 

पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनाधिकारी गोरेवाड्यात पोहोचले. वाघाचे सहाय्यक प्रा. माधुरी हेडाऊ, डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजीत कोलंगधे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी एनटीसीएचे अधिकारी हेमंत कामडी, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते. प्रक्रियेदरम्यान, डॉ. शिरीष उपाध्ये, विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्षक ए.एस. शालिनी, माडभूशी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृतदेहाला जाळण्यात आले. 

पाच जणांचे घेतले होते बळी 

फेब्रुवारी ते सात जूनपर्यंत कोलारा, वामनगाव, सातारा तुकूम या भागात वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेले. यामुळे लोकांत मोठा असंतोष निर्माण झाला. आणि यातूनच वाघाला पकडण्याची किंवा मारण्याची मागणी जोर धरू लागली. लोकांचा असंतोष लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याचे आदेश ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाला दिले होते. 

चंद्रपूरची जखमी वाघीण गोरेवाड्यात 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथील वाघाचा मृत्यू झाला असताना या जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्रामधील ब्राम्हणीतील एका घरात शिरलेल्या वाघिणीस जेरबंद करून आज गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले. हा नवीन पाहुणा उपचारासाठी आला असताना क्वारंटाइन असलेल्या एका वाघाने मात्र, जीव सोडला. नवीन आलेली वाघीण अतिशय अशक्त आहे. नागभीड वनपरिक्षेत्रातील मांगलीमधील ब्राम्हणी या गावात पिंटू देशमुख यांचे घरात वाघीण शिरली होती. त्या वाघिणीला वन विभागाने रविवारी रात्रीच जेरबंद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com