नागपूर जिल्हयात वाढला वाघाचा वावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

जिल्ह्यात चार राखीव क्षेत्र व महसुली जंगलामुळे वाघ व वन्यप्राण्याद्वारे होणाऱ्या नुकसानाचे आकडे मोठे आहेत. यातील काही प्रकरणाच्या नोंदी मिळाल्या तर अनेक ठिकाणी नुकसान असूनही वाहितीवर शेती करीत आहेत. ते नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करीत नसल्याची माहिती आहे.

नागपूर : राज्यात वाघांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी वाढली असताना जिल्ह्यातही वाघांचा आकडा फुगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात वाघांचे दर्शन हमखास होत आहे. ही पर्यटकांना सुखद धक्का देणारी असली तरी हा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. मिहानमधील इन्फोसिसजवळ शहराच्या वेशीवर आलेल्या वाघामुळे शेतकऱ्यांमध्येच नव्हे तर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

वाघा आला रे आला !
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या परिसरात वाघ व इतर वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्याच्या एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत 182 प्रकरणांची नोंद झाली आहे. या कालावधीत वन्यप्राण्यांनी 44 लोकांवर हल्ला केला. जंगलालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांनी शेतमाल नुकसान केल्याच्या 3 हजार 631 प्रकरणांच्या नोंदी केल्या आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पाशेजारील परिसरात वाघ दिसल्याच्या अनेक घटना आहेत. हिंगणा तालुक्‍यात मागील 20 महिन्यात 120 हून अधिक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून शिकार केलेली आहे. याच प्रकल्पालगतच्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातही शिकारीच्या दीडशेहून अधिक घटना नोंदविल्या आहेत. रामटेक तालुक्‍यातील दोन अभयारण्यालगतच्या परिसरात वाघाचे दर्शन नेहमीच होत असते. येथे वाघाने पाळीव प्राण्याची शिकार केल्याच्या 17 प्रकरणांची नोंद आहे. कुही तालुक्‍यातही 56 जनावरांची शिकार केल्याच्या घटना नोंद आहेत. सावनेर तालुक्‍यात वाघाने दिसल्याच्या आठ घटना नोंद आहेत. यासोबतच नरखेड, मौदा, कळमेश्‍वर कामठी तालुक्‍यातही वाघाचा वावर असल्याचा पुरावा वनविभागाकडे आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात विविध घटनेत आतापर्यंत यंदा तीन वाघांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात बोर, पेंच हे दोन व्याघ्र प्रकल्प तर मानसिंगदेव, उमरेड-कऱ्हांडला हे दोन अभयारण्ये आहेत. या सर्व जंगलात वाघ आहेत. पेंच प्रकल्पात रामटेक, पारशिवनी व सावनेर तालुक्‍याच्या परिसरात विस्तारले आहेत. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य कुही, उमरेड व भिवापूर तालुक्‍यातील जंगलाचे वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार हिंगणा, नागपूर, ग्रामीण व काटोल तालुक्‍याशी जोडलेल्या आहेत. याशिवाय कळमेश्‍वर, नरखेड तालुक्‍यातही महसुली जंगले आहेत. सर्वाधिक महसुली जंगल उमरेड व भिवापूर तालुक्‍यात आहे. यामुळे ग्रामीणांमध्ये वाघ दिसल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात.

शेत मशागतीवर परिणाम
जिल्ह्यात चार राखीव क्षेत्र व महसुली जंगलामुळे वाघ व वन्यप्राण्याद्वारे होणाऱ्या नुकसानाचे आकडे मोठे आहेत. यातील काही प्रकरणाच्या नोंदी मिळाल्या तर अनेक ठिकाणी नुकसान असूनही वाहितीवर शेती करीत आहेत. ते नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करीत नसल्याची माहिती आहे. मात्र, वनविभागाकडून वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई दिल्याचे सांगण्यात आले. हा आकडा कोट्यवधींचा आहे. मात्र, अनेक तालुक्‍यात नुकसानभरपाई मिळालीच नाही असाही दावा शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे वाघ असल्याची चर्चा होताच मजूर कामावर जाण्याचे टाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger fever grew up in Nagpur district