esakal | वाघ बघायचाय? चला प्राणहिता अभयारण्यात; इथे घुमतेय वाघाची डरकाळी
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

प्राणहिता अभयारण्य घोषित झाले असले, तरी हे अभयारण्य अतिदुर्गम भागात असल्याने येथे पर्यटकांची पावले फारशी वळत नाहीत. शिवाय येथील प्राण्यांवर विशेष संशोधनही झालेले नाही.

वाघ बघायचाय? चला प्राणहिता अभयारण्यात; इथे घुमतेय वाघाची डरकाळी

sakal_logo
By
संतोष मद्दिवार

अहेरी (गडचिरोली) : काही वर्षांपूर्वीच घोषित झालेल्या व महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्राणहिता अभयारण्यात अनेक वर्षांनंतर वाघाची डरकाळी घुमू लागली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत असून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या वाघांच्या संरक्षणासाठी वनविभाग दक्ष आहे.

प्राणहिता अभयारण्य घोषित झाले असले, तरी हे अभयारण्य अतिदुर्गम भागात असल्याने येथे पर्यटकांची पावले फारशी वळत नाहीत. शिवाय येथील प्राण्यांवर विशेष संशोधनही झालेले नाही.

त्यामुळे काही प्रमाणात हे अभयारण्य कागदोपत्रीच होते. पण, काही दिवसांपूर्वी येथे वाघ दिसू लागला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच वाघीणही दिसली. सध्या येथे वाघाची जोडी फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने वनविभाग त्यांचा मागोवा घेत आहे.

पूर्वी या परिसरात निसर्गप्रेमी गोंड, माडिया आदिवासींचीच वस्ती होती. निसर्गाशी एकरूप असलेले आदिवासी वन्यजीवांना दैवत मानतात. त्यामुळे त्यांनी येथील वन्यजीव व निसर्गही जपला. पण, ऐंशीच्या दशकात या जंगलामध्ये बांगलादेशी शरणार्थ्यांचे कॅम्प वसविण्यात आले. तेव्हापासून येथे आमुलाग्र बदल घडायला लागले. जंगलात वस्त्या वाढल्या आणि शेतीचा विस्तार होताना जंगले आक्रसू लागली. शिवाय वन्यजीवांची शिकार, तस्करीचे प्रमाणही वाढत गेले. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने असलेले वाघ दिसेनासे झाले.

सरकारने काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर आणि पुणे जिल्ह्यातील सुधागड या तीन नवीन अभयारण्यांची घोषणा केली होती. ४२० चौरस किलोमीटरच्या प्राणहिता अभयारण्यात मध्य भारतातील अतिदुर्मिळ रानम्हशींचे अस्तित्वसुद्धा आहे. आता येथे वाघाचा वावर वाढल्याने हे अभयारण्य पुन्हा चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा - ‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो‘ म्हणत केली पैशांची मागणी..नकार मिळताच केले हे धक्कादायक कृत्य..वाचून तुम्हालाही बसेल धक्का

ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे लक्ष...
वनविभागाकडून या वाघांवर ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. येथे आढळलेला वाघ नर असून पौगंडावस्थेत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. सुमारे एक महिन्यापासून तो याच भागात फिरत आहे. आतापर्यंत तीन पाळीव पशूंची त्याने शिकार केली आहे. त्याने केलेल्या शिकारी जवळ कॅमेरे बसवून त्या वाघाचे छायाचित्र घेण्यात आले. तसेच आता येथे वाघीणही दिसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येथे वाघांचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी निसर्गप्रेमी करत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image