esakal | पाच जणांचे बळी घेणारा झाला जेरबंद; चार अजूनही मोकळेच  
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

वाघांची संख्या वाढली आहे. त्यांना अधिवासासाठी जंगल कमी पडत आहे. त्यामुळे ते बाहेर येत आहेत. त्यामुळे वाढलेली वाघाची संख्याच आता जिल्ह्यातील लोकांसाठी संकट ठरत आहे.

पाच जणांचे बळी घेणारा झाला जेरबंद; चार अजूनही मोकळेच  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांनी उच्चांक गाठला आहे. एका वर्षात वाघाच्या हल्ल्यात 24 जण ठार झाले तसेच 3,918 प्राण्यांचे बळी गेले. या वाघांना जेरबंद करण्याचे आदेश निघाले आहेत.  पैकी आज, बुधवारी  कोलारा परिसरात एका वाघाला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चिमूर तालुक्‍यातील कोलारा परिसरात पाच महिन्यांत दोन महिला व तीन पुरुष अशा पाच जणांना या वाघाने ठार केले होते. या वाघाला ठार करण्याकरिता वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळाले. त्यानंतर आज, बुधवारी सकाळपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी 26 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबविली. अखेर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चैतीवन संरक्षित क्षेत्रात या वाघाला जेरबंद करण्यात यश आले.  ही मोहीम वरिष्ठ वनाधिकारी लडकत, खोरे, जाधव, व्याघ्र संरक्षण दलाच्या जाधव, आरएफओ शेंडे, चव्हाण, आरओ कोडापे यांच्या पथकाने राबविली. 

वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचे देशातच मोठे कौतुक केले जाते. मात्र, यामुळे मानव -वन्यजीव संघर्ष वाढला आहे. जंगली श्‍वापद पाणी आणि शिकारीच्या शोधात गावखेड्यात, शेताशिवार आणि शहरालगत येतात. माणसं सरपण आणि मोहफुलांसाठी जंगलात जातात. त्यामुळे हा संघर्ष निर्माण होतो आणि माणसांचे जीव जातात. सोबतच पाळीव जनावरेही मारली जातात. वर्षभरात हल्ले करून गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि अनेकांचे जीव घेणाऱ्या चार वाघांना जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाने काढले आहेत. यातील दोन वाघांचा वावर चंद्रपूर शहरालगतच्या इरई नदी परिसरात आहे. नागभीड आणि राजुरा तालुक्‍यातील प्रत्येकी एका वाघाचा यात समावेश आहे.

अवश्य वाचा- त्याने दुसऱ्याच्या पत्नीचे स्टेटस ठेवले आणि....

बुधवारी जेरबंद करण्याचा आदेश निघालेला वाघ कोल्हारा परिसरातील आहे. त्याला सायंकाळपर्यंत पकडण्यात यश आले. वाघांची संख्या वाढली आहे. त्यांना अधिवासासाठी जंगल कमी पडत आहे. त्यामुळे ते बाहेर येत आहेत. त्यामुळे वाढलेली वाघाची संख्याच आता जिल्ह्यातील लोकांसाठी संकट ठरत आहे. जिल्ह्यात 2015 मध्ये 110 वाघ होते. त्यानंतरच्या काळात वाघांच्या संरक्षणासाठी मोठी पावलं उचलण्यात आली. त्यामुळे अवघ्या पाच वर्षात ती दोनशेवर पोहोचली. वाघांची संख्या वाढ वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाला सुखावणारी आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना याची किंमतही मोजावी लागत आहे. 

स्थलांतर करण्याचे प्रयत्न

जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली. पण त्यांचे व्यवस्थापन त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळेच आतापर्यंत चार वाघांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्नरत आहे. आज चिमूर तालुक्‍यातील कोल्हा परिसरातील वाघाला जेरबंद करण्याचा आदेश वनविभागाने काढला आहे. या नर वाघाने गेल्या 3 महिन्यात कोलारा आणि आजूबाजूच्या गावातील 5 लोकांचा बळी घेतला. वाघांची वाढती संख्या एकीकडे जिल्ह्यासाठी संकट ठरत असली, तरी देशातील अनेक भागात वाघांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने हे एक वरदान देखील ठरू शकते. त्यामुळेच जिल्ह्यातील किमान 50 वाघ इतरत्र स्थलांतरित करावे यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे. 


चार पटीने मृत्यू वाढले 

सन 2014-15 मध्ये सहा माणसे आणि 1392 पाळीव जनावरे वाघांच्या हल्ल्यात ठार झाली होती. 2015-16 मध्ये सात माणसे आणि 2228 पाळीव जनावरे ठार झाली. 2016-17 मध्ये वाघांनी सहा मानवांच्या गळ्याचा घोट घेतला. याच वर्षात 2076 पाळीव जनावरेही ठार झाली. 2017-18 मध्ये मानव नऊ तर जनावरे 2150 ठार झाली. सन 2018-19 मध्ये 20 माणसं वाघांच्या हल्ल्यात दगावली तर 2432 पाळीवर जनावरे ठार झाली. सन 2019 -20 या वर्षात नवा उच्चांक गाठला. वाघांच्या हल्ल्यात तब्बल 24 गावकऱ्यांनी जीव गमावला तर 3918 पाळीव जनावरे ठार झाली. वाघ दुप्पट झाले तसे माणस आणि पाळीव जनावरांचे मृत्यूही चार पटीने वाढले आहेत.