टीपेश्वर अभयारण्यात पुन्हा एकदा मानव व वन्यप्राणी संघर्ष शिगेला

tipeshwarwildlife
tipeshwarwildlife

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : टिपेश्‍वर अभयारण्य जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यातही एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. याच अभयारण्य परिसरात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष शिगेला पोहोचत आहे. शनिवारी (ता.१९) तालुक्‍यातील अंधारवाडी येथील महिलेचा वाघाने बळी घेतल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची वाढलेली संख्या पर्यटकांसाठी मेजवाली ठरत असताना लोकांना आपला जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे. वनविभागाने यावर कायम तोडगा काढणे आवश्‍यक आहे. या अभयारण्यात हरिण, काळवीट, रानमांजर, नीलगाय आदी वन्यप्राणी आहेत. वाघांमुळे टिपेश्‍वर अभयारण्य परिसरात राहणारे शेतकरी, शेतमजूर नेहमीच दहशतीत असतात. जीव मुठीत घेऊनच त्यांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत.

शनिवारी अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडांजे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. महिला शेतात काम करीत असताना दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला चढविला. यापूर्वी शेतात काम करणाऱ्या सुभाष कायतवार याचा वाघाने पाठलाग केला. प्रसंगवधान ओळखून झाडावर चढल्याने त्यांचा जीव वाचला. विठोबा वगारहांडे या शेतकऱ्यालाही अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

वाघाने अंधारवाडी, पाटणबोरी, वाऱ्हा परिसरात गाय, बैल, बकऱ्या अशा अनेकांच्या पशुधनाचा फडशा पाडला आहे. काही वर्षांपूर्वी सुन्ना गावाजवळ एक वाघ नेहमीच पशुधनाचा फडशा पाडत असल्याने तेथील गावकऱ्यांनी वाघाला विष टाकून मारल्याची घटना घडली होती. टिपेश्‍वरच्या पायथ्याशी असलेल्या पारवानजीक फासा टाकून वाघाला मारण्यात आले होते. पांढरकवडा वनविभागात अंतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्‍यात अवनीने १३ लोकांचा जीव घेतला होता.

टिपेश्‍वर परिसरात वाघ व मानव असा संघर्ष नेहमीच निर्माण होत आहे. हा संघर्ष टाळून वाघांचा नागरी वस्तीत प्रवेश होऊ नये, यासाठी यवतमाळात पाच सप्टेंबर रोजी वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत बैठक पार पडली होती. वाघ नागरीवस्तीत प्रवेश करणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. दिवसरात्र पेट्रोलिंग करण्यासाठी २० जणांच्या टीमचे गठन, वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्‍यू टीम व विशेष व्याघ्रसंरक्षण दल वाहनासह तैनात करण्यात यावी, अशी सूचनाही दिली होती. वारंवार घडणाऱ्या घटनांवर कायमचा तोडगा काढणे आवश्‍यक आहे, अन्यथा पशुधनासह शेतकरी व शेतमजुरांचा जीव जात राहील.

सविस्तर वाचा - पाहिलेत का कधी प्रेमाचे गाव?


ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे
वनविभागाने वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. अंधारवाडी, टेंभी शिवारात फिरणाऱ्या वाघिणीची डीएनए तपासणी करण्यासाठी नमूने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच अंधारवाडी येथील घटना घडली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com