"त्या' दुचाकीस्वारांजवळ आढळल्या वाघाच्या मिशा... 

नाहीद सिद्दीकी
Saturday, 25 July 2020

मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पद्मापूर तपासणी नाक्‍यावर वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी नेहमीच करण्यात येत असते. या तपासणी नाक्‍यावर शुक्रवारी, 24 जुलै रोजी मोहर्लीवरून एमएच -34, एएन 0728 क्रमांकाची एक दुचाकी आली.

मोहर्ली (जि. चंद्रपूर) : ताडोबाचे प्रवेशद्वार असलेल्या पद्मापूर येथील तपासणी नाक्‍यावर तपासणीदरम्यान दुचाकीस्वाराकडे वाघाच्या मिशा आढळून आल्या. ही गंभीर घटना लक्षात येताच दुचाकीवरील दोन जणांना वनविभागाने ताब्यात घेतले. 

मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पद्मापूर तपासणी नाक्‍यावर वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी नेहमीच करण्यात येत असते. या तपासणी नाक्‍यावर शुक्रवारी, 24 जुलै रोजी मोहर्लीवरून एमएच -34, एएन 0728 क्रमांकाची एक दुचाकी आली. या दुचाकीवर मुधोली येथील नरेंद्र विठ्ठल चौधरी व भामडेळी येथील मनोज विठ्ठल शेंडे हे दोघे स्वार होते. या गाडी थांबवून त्यावरील लोकांची तपासणी नाक्‍यावरील वनविभागाचे कर्मचारी करीत होते. तपासणीमध्ये दुचाकीस्वारांजवळ वाघाच्या 12 मिशा आढळून आल्या. 

अवश्य वाचा- असह्य वेदनांची अखेर; संजीवनीची कर्करोगाशी झुंज अपयशी, तरीही बारावीत मिळविले तब्बल एवढे टक्के....

या घटनेची माहिती लगेच वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासामध्ये आणखी दोन इसमांची नावे समोर आली. मुधोली येथील सुभाष गोवर्धन पेंदलवार आणि कैलास भाऊराव दडमल यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. वाघाच्या मिशा या आरोपींजवळ सापडल्याने त्यांनी एक तर वाघाची शिकार केली असावी किंवा एखाद्या मृत वाघाच्या मिशा काढून घेतल्या असाव्या असा अंदाज आहे, ते चौकशीअंती स्वष्ट होईलच. त्याचा तपास आता केला जाणार आहे. हे चारही आरोपी ताडोबालगतच्या क्षेत्रातील रहिवासी आहेत, हे विशेष. 

अवश्य वाचा- विचित्र अपघात! तीन ट्रकला उडवून तो धडकला पेट्रोल पंपावर आणि....

दरम्यान, कारवाई करतेवेळी सहायक वनसंरक्षक येडे, वनपरिक्षेत्राधिकारी राघवेंद्र मून, वनपाल धर्मेंद्र राऊत, भूषण गजापुरे, के.बी. देऊरकर, आर. एस. महातव, वनरक्षक विलास सोयम, डी. डी. केजकर , एस. लाटकर, भट यांची उपस्थिती होती. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tiger's mustache found near two-wheeler riders...