"टिलीमिली' देणार विद्यार्थ्यांना मनोरंजनासह शिक्षण,सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर शिक्षण मालिकेची सुरुवात

"टिलीमिली' देणार विद्यार्थ्यांना मनोरंजनासह शिक्षण,सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर शिक्षण मालिकेची सुरुवात

अमरावती :  कोरोनाच्या कालावधीत राज्यात शाळा सुरू होणार की नाही, शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन हा वाद शिगेला पोहोचला असताना अखेर राज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून "टिलीमिली' या उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 20 जुलैपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे.

14 मार्चपासून राज्यातील शाळा कोरोना प्रादुर्भावामुळे बंद आहेत. शिक्षण सुरू राहावे म्हणून राज्यात अनेक जिल्ह्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. शेवटी राज्यस्तराहून "शाळा बंद पण शिक्षण सुरू' या मालिकेद्वारे मुलांचे मोबाईलवर शिक्षण सुरू होते. परंतु राज्यात शिक्षण ऑनलाइन द्यायचे की ऑफलाईन यावर एकमत होत नव्हते.

आता यावर शासनाने तोडगा काढला असून तीन दिवसांपूर्वी एका खासगी मोबाईलच्या ऍपद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार असल्याची शासनाने घोषणा केली. आता सह्याद्री वाहिनीद्वारेसुद्धा प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाणार आहे.

या प्रयोगामुळे राज्यातील सुमारे दीड कोटी टिलीना व मिलीना अर्थात मुलामुलींना लाभ होणार असून शिक्षण कंटाळवाणे होऊ नये म्हणून मनोरंजक पद्धतीने त्याचे सादरीकरण होणार आहे. कुठल्याही व्याख्यानाचा यामध्ये समावेश राहणार नसून कृतीयुक्त उपक्रमाद्वारे सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

रोज एका इयत्तेचा एका विषयाचा पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसात 60 एपिसोडमध्ये सादर केले जातील. सोमवार ते शनिवार याचे प्रसारण होणार असून आठही इयत्तेचे मिळून 26 सप्टेंबरपर्यंत एकूण 480 एपिसोडची महामालिका राहणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com