
टिपेश्वर अभयारण्य; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील पर्यटकांना वाघांची भुरळ
यवतमाळ : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात पर्यटकांना हमखास व्याघ्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील पर्यटकांना टिपेश्वर अभयारण्य खुणावत आहे.उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागरिकांना घराबाहेर पडायला मिळाले आहे. त्यातच टिपेश्वर अभयारण्यात बच्चेकंपनीही उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसते. टिपेश्वर अभयारण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध असल्याने गर्दी होताना दिसते.
निसर्गसौंदर्य आणि वाघांनी टिपेश्वर अभयारण्य नटलेले आहे. येथे मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, कर्नाटक यांसह इतर भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. १४८ किलोमीटर परिसरात टिपेश्वर अभयारण्य आहे. अभयारण्यामुळे जवळपास शंभरपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे. सकाळी साडेपाच वाजता जंगल सफारीसाठी प्रवेश दिला जातो.
वाघ, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा या वन्यप्राण्यांसह दुर्मीळ पक्षीही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या उन्हाळ्यात आर्ची या वाघिणीसह तिच्या बछड्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. वन्यप्राण्यांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वाघ पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचे ठरावीक ठिकाण असल्याने तेथेच ते येतात.