आजपासून राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : अखिल विश्‍वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात्‌ सर्व संत स्मृती मानवता दिन 13 ते 20 ऑक्‍टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यातील शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम 19 ऑक्‍टोबरला होणार आहे. या वेळी योगगुरू स्वामी रामदेवबाबा, हार्ट फुलनेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमलेश पटेल उपस्थित राहतील.

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : अखिल विश्‍वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात्‌ सर्व संत स्मृती मानवता दिन 13 ते 20 ऑक्‍टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यातील शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम 19 ऑक्‍टोबरला होणार आहे. या वेळी योगगुरू स्वामी रामदेवबाबा, हार्ट फुलनेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमलेश पटेल उपस्थित राहतील.
20 ऑक्‍टोबर रोजी गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 51 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात रविवारी (ता. 13) पहाटे साडेचार वाजता तीर्थस्थापना व चरणपादुका पूजनाने होईल. राजेंद्र कठाळे, सुभाष नेमाडे, वासुदेव कुरवाडे, राजेंद्र चव्हाण अखंड वीणा वादनास प्रारंभ करतील. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा मानकर स्वामी (आळंदी) यांच्या संयोजनाखाली काढण्यात येईल.
15 ऑक्‍टोबर दुपारी 12 ते 5 या वेळात आंतर महाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. 16 ऑक्‍टोबरला श्रीगुरुदेव आयुर्वेद मंदिर (रसशाळा) अमृत महोत्सव समारंभ होईल. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार डॉ. विकास महात्मे करणार आहेत. 17 ऑक्‍टोबरला पुष्पा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन होईल. प्रमुख पाहुणे जि. प. सदस्य गौरी देशमुख, प्रा. रेखा बेलसरे, प्रा. डॉ. संजीवनी ठाकरे, ज्योती सैरासे, प्रभा आवारे, सभापती अर्चना वेरूळकर, पंचायत समिती सदस्य रंजना पोजगे, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, गुरुदेवनगरच्या उपसरपंच वनिता डेहणकर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी (ता. 18) सकाळी 9 ते 5 या वेळात ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश महाराज वाघ राहतील. उद्‌घाटन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे करणार आहेत.
या वेळी डॉ. प्रदीप विटाळकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण हे उपस्थित राहतील. 19 ऑक्‍टोबरला सकाळी 9.15 ते 12 या वेळात डॉ. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ कार्यकर्ता संमेलन होईल.
प्रचार प्रमुख दामोदर पाटील यांच्या संयोजनाखाली आयोजित या संमेलनाला वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंट्टीवार, पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ उपस्थित राहतील. 20 ऑक्‍टोबरला सकाळी साडेसहा वाजता अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुब्बाराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी 6.40 ते 10 या वेळात गावागावांतून आलेल्या पालख्यांची शोभायात्रा काढण्यात येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today from marks the death anniversary of the rashtrasant tukdoji maharaj