तोतलाडोह धरण हाउसफुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

टेकाडी/नागपूर, ता. 9 : पेंच नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नागपूरकरांना पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण हाऊसफुल झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी भरेल की नाही अशी चिंता सतावत असताना सोमवारपर्यंत धरणात 85 टक्के साठा झाला होता.

पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील चौराई धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तोतलाडोह 85 टक्के भरले असून आता येथूनही विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंच व कन्हान नदीकाठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केले आहे. तोतलाडोह धरणात सरासरीपेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नागपूर शहरावर असलेले जलसंकटाचे सावट टळले आहे. मध्यप्रदेश सरकारने पेंच नदीवर बांधलेल्या धरणामुळे तोतलाडोह जलाशयात मागील वर्षी सरासरीच्या निम्मे जलसाठा होता. यावर्षी मृतसाठ्यातून नागपूर शहराला पाणी देण्यात आले होते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस कोरडे गेल्यामुळे आगामी वर्षात जलसंकट गडद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र मागील महिनाभरापासून सातपुड्याच्या महादेव टेकड्यांमध्ये अतिवृष्टी व संततधार पावसामुळे मध्य प्रदेशातील चौराई धरण पूर्णत: भरले व पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Totladoh Dam Full