राधाचे प्रेम खुलले आणि फुलले

प्रणोती मडावी
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वयात आल्यावर तिला तिचा राजकुमार भेटला. ऋणानुबंध जुळले अन्‌ सुरू झाला साता जन्माचा प्रवास. त्या दोघांचा सुखाचा संसार बघून जाणवते राधा आणि देवदत्त खरेखुरे व्हेलेंटाइन.

नागपूर : लहानपणीच राधाच्या डोक्‍यावरून आई-वडिलांचे छत्र हरवले, सावत्र आईच्या मायेत राधा लहानाची मोठी होत असताना तिला एका सधन कुटुंबाने दत्तक घेतले. मात्र दैवाला ते मान्य नव्हते. त्यामुळे नशिबी आलेला वन मॅन आर्मीचा प्रवास राधाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या घटना घडत होत्या अन्‌ राधा लहानाची मोठी होत होती. वयात आल्यावर तिला तिचा राजकुमार भेटला. ऋणानुबंध जुळले अन्‌ सुरू झाला साता जन्माचा प्रवास. त्या दोघांचा सुखाचा संसार बघून जाणवते राधा आणि देवदत्त खरेखुरे व्हेलेंटाइन.

तामिळनाडूपासून सुरू झालेला राधाचा प्रवास वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेपर्यंत येऊन पोहचला. येथेच तिचे शालेय शिक्षण झाले. एक दिवशी ज्या कुटुंबाने दत्तक घेतले त्या घरातील कर्त्या महिलेचा मृत्यू झाला अन्‌ राधा पुन्हा आईच्या मायेला पोरकी झाली. घटना घडली अन्‌ त्या सधन कुटुंबातील कर्त्या पुरुषाने राधाला शाळेत पोचते केले ते अखेरचेच. पालक घ्यायला आले नाहीत म्हणून शिक्षिकेने राधाला कमलाताई परांजपे बालसदनगृहात पाठवले.

बालसदनगृहातील प्रत्येक विद्यार्थी जगतो तसेच राधाचे जीवन होते. मात्र प्रचंड हुशार असलेल्या राधाच्या सुसंस्कारांना तेथे येणाऱ्या रवींद्र संगीतराव यांनी अचूक हेरले होते. रवींद्र संगीतराव बालसदनगृहात आले की, प्रत्येकवेळी राधाशी मनसोक्‍त संवाद साधायचे. एकदा असेच रवींद्र संगीतराव यांच्या मित्राच्या घरी मंगलकार्य होते. तेथे बादसदनात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे त्यात राधादेखील होती. राधाने इयत्ता दहावीतून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यामुळे ती गुणी असल्याचे सर्वश्रुत होते. पुढे तिने बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेतले. पदवीही प्राप्त केली.

असेच एकदा बालसदनगृहात संस्कार वर्ग घेण्यासाठी रवींद्र संगीतराव यांच्यासोबत आलेल्या मित्राने डॉ. खानवलकर यांनी राधासाठी स्थळ सूचवले. परंतु, कसलीही घाई न करता रवींद्र संगीतराव यांनी प्रथमत: वरपक्षाला भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. कारण त्यांना राधाची पार्श्‍वभूमी वरपक्षाच्या मंडळींना सांगायची होती. देवदत्त पंडित असे नवरदेवाचे नाव. पाहण्याचा कार्यक्रम उरकला अन्‌ रवींद्र संगीतराव यांनी राधाची पार्श्‍वभूमीदेखील पंडित कुटुंबाला कळवली. मात्र कोणतीही अट न ठेवता देवदत्त पंडित यांच्या घरच्यांनी संगीतराव यांना होकार कळवला. 2016 साली वैदिक पद्धतीने राधा व देवदत्त पंडित विवाह बंधनात अडकले.

लग्नापूर्वीच घातली होती अट
लग्नापूर्वीच राधाने देवदत्तला घातलेली अट त्यांनी मान्य केली होती. त्यानुसार राधाने पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतले. देवत्तच्या बळकट आधाराने राधाचा प्रवास लता मंगेशकर रुग्णालयापर्यंत पोहचला असून, येथे राधा क्‍लिनिकल इंस्ट्रक्‍टर म्हणून कार्यरत आहे. प्रत्येक सफल पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. पण, राधाबाबत जरा वेगळेच होते. एकमेकांच्या साथीने आणि सहवासाने दोघांचे प्रेम खुलले आणि फुलले. दोघे 11 महिन्यांच्या गोंडस बाळाचे पालक आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Touching love story of Radha