
गणेशोत्सवानिमित्त देव्हाडा येथील वैनगंगा साखर कारखान्यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. ते पाहण्यासाठी नीलज बुज. येथील महिला, पुरुष, युवक साखर कारखान्यात जायचे. यातूनच गावातील युवकांना आपल्या गावातही गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना सुचली. त्यामुळे अनंत चतुर्दशीनंतर मस्कऱ्या गणपती स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
नीलज बु. (जि. भंडारा) : लोकमान्य टिळकांनी समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. यातूनच गावागावात गणेशोत्सव मंडळे निर्माण झाले. मोहाडी तालुक्यात नीलज बु. येथे गेल्या ३५ वर्षांपासून मस्कऱ्या गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. गावातील आबालवृद्धांच्या सहभागातून हा उत्सव सुरू आहे.
मोहाडी तालुक्यातील नीलज बु. हे वैनगंगेच्या काठावरील शेतकऱ्यांचे गावात आहे. येथील लोकांना लहानलहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. त्यात गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना होता. जवळच्या देव्हाडा बु. येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना सुरू झाला; तेव्हा कारखान्यात निवासी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली.
गणेशोत्सवानिमित्त तेथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. ते पाहण्यासाठी नीलज बुज. येथील महिला, पुरुष, युवक साखर कारखान्यात जायचे. यातूनच गावातील युवकांनी आपल्या गावातही गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना सुचली. पण, आपल्या गावात कोणीही येणार नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशी नंतर मस्कऱ्या गणपती स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा : रहने को घर नही! हरवला त्यांचा निवारा
गावात मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन करून १९८३ पासून गणपती स्थापना करायला सुरुवात केली. पहिल्यांदा स्व. कवडू बडगे यांच्या आवारात गणपती स्थापन करण्यात आला. पुढे पाच वर्षे ही परंपरा अविरत सुरू होती. नंतर काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे तीन वर्षे गावातील मस्कऱ्या गणेशोत्सवाला खंड पडला. त्यानंतर गावातील युवकांनी पुढाकार घेऊन १९९१ मध्ये पुन्हा मस्कऱ्या गणपतीची परंपरा सुरू केली ती आजही सुरू आहे.
मस्कऱ्या गणपतीच्या निमित्ताने गावात रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, संगीत नाटक, तमाशा, कव्वाली, भजन-कीर्तन स्पर्धा, विविध प्रकारची मैदानी खेळांचे आयोजित करण्यात येत होते. गणेशोत्सवात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. यातून गावातील लहानमोठ्यांना आपल्या अंगातील कलागुणांचे प्रदर्शन करून शाब्बासकी मिळत होती. त्यातून अनेक कलाकार समोर आले.
जाणून घ्या : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आता कृषीकर्ज प्रक्रिया होणार अधिक सुलभ; वाचा महत्वाची बातमी
मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळाचे पूर्व कार्यकर्ते धनवर बडगे सांगतात की, त्यावेळी आम्ही ५१ रुपयांची गणपतीची मूर्ती स्थापन केली होती. गावातील लोकांनी दिलेल्या वर्गणीतून १२०० रुपये गोळा केले होते. यातून १० दिवसांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा केला होता. यावर्षी कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे मस्कऱ्या गणपती स्थापन केला आहे. परंतु, मूर्ती छोटी असून, घरगुती स्वरूपात गावात उत्सव साजरा करण्यात येत आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)