
परंपरेनुसार कधी विदूषक, कधी हवालदार, कधी हनुमान अशी रूपे घेऊन या समाजातील मंडळी घरोघरी फिरून लोकांचे मनोरंजन करायची. पण, लोक त्यांना कष्ट करता येत नाही म्हणून नव्या पद्धतीने भीक मागतात, अशी दूषणे द्यायची
गडचिरोली : ते निरक्षर आहेत, पण त्यांनी शेकडो गीते रचली आहेत. बुद्धी आणि स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, कागदावर न लिहिता रचलेली शेकडो गीते त्यांना मुखोद्गत आहेत. ते जेव्हा त्यांच्या पहाडी आवाजात पोवाडा, लावणी गातात तेव्हा जनसमुदाय तल्लीन होतो. पण कधीकाळी संपूर्ण समाजावर गारुड घालणारी त्यांची लोककला आता नामशेष होत आहे. या अनोख्या लोककलेचे शेवटचे अवशेष म्हणून तेच उरले आहेत. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर गावच्या बहुरूपी समाजातील तुरा मंडळाची ही लोककला आणि तिची व्यथा मनाला चटका लावणारी आहे.
हेही वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे
देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या छोट्याशा गावात बहुतांश घरे बहुरूपी समाजाची आहेत. परंपरेनुसार कधी विदूषक, कधी हवालदार, कधी हनुमान अशी रूपे घेऊन या समाजातील मंडळी घरोघरी फिरून लोकांचे मनोरंजन करायची. पण, लोक त्यांना कष्ट करता येत नाही म्हणून नव्या पद्धतीने भीक मागतात, अशी दूषणे द्यायची. या अपमानाने व्यथित होऊन येथील हरिदास विठोबा सुतार, ज्ञानेश्वर विठोबा सुतार, भगवान श्रावण तांदुळकर, गंगाधर नारायण माहुरे, आलादास दिना सहारे आदी मंडळींनी वेगळा पर्याय म्हणून पारंपरिक लोकगीते सादर करण्याचा निर्धार केला. नागपूरचे हरी पाटील टिमकीवाले यांना गुरू करून या मंडळींनी त्यांच्या फडात उमेदवारी केली. या हरी पाटील टिमकीवाल्यांचे गुरू सोमा सावजी होते. अशा या प्राचीन गुरुशिष्य परंपरेतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून ही लोककला प्राप्त केल्यानंतर या कलावंतांनी तुरा मंडळ सुरू केले. यातील भगवान तांदुळकर गीतकार आहेत. हरिदास सुतार उत्तम किंगरी वाजवतात, ज्ञानेश्वर सुतार डफावर कडक थाप देत त्या गीताला तालबद्ध करतात, तर गंगाधर माहुरे स्वरसाज चढवतात. तशी ही गीते सारीच मंडळी आपल्या पहाडी आवाजात गातात. विशेष म्हणजे यातील एकालाही अक्षर ओळख नाही. तरी ते प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अशा अनेक महान व्यक्तींवर सहज गीते तयार करून गातात. शिवाय विविध सामाजिक समस्यांसह अगदी अलीकडच्या कोरोना महामारीवरही गीत तयार करून त्यांनी जनजागृती केली.
हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का...
हे सारे निरक्षर असले, तरी त्यांना शिघ्रकवीची निसर्गदत्त प्रतिभा आणि विलक्षण स्मरणशक्ती लाभली आहे. त्यामुळे यातील कोणतेच गीत कागदावर न लिहिताही त्यांना प्रत्येक गीत तोंडपाठ आहे. सलग तीन तास कुठलाही कागद हाती न धरता ते आपल्या स्वरचित गीतांचे गायन करू शकतात. पण, त्यांच्या प्रतिभेला म्हणावे तसे व्यासपीठ आणि सन्मान अद्याप मिळाला नाही. आरोग्य प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभनेसारख्या समाजशील व्यक्ती त्यांना मदत करतात. पण, एरवी हे लोककलावंत अंधारातच सूर आळवीत आहेत.
हेही वाचा -
वारसा चालवणार कोण?
वयाच्या १८- २० व्या वर्षापासून ही मंडळी पारंपरिक व नव्याने तयार केलेली लोकगीते गात आहेत. या लोककलेचा वारसा त्यांनी आपल्या पिढीपर्यंत आणला. पण, आता पुढची पिढी हा वारसा घ्यायला तयार नाही. बदलत्या काळात मनोरंजनाची साधने बदलली. पूर्वीसारखे तमाशाचे फड, लोकगीतांचे कार्यक्रम राहिले नाहीत. झाडीपट्टी नाटकांतही या पारंपरिक लोकगीतांऐवजी डान्स हंगामासारख्या आचरट कार्यक्रमांना पसंती दिली जाते. त्यामुळे या कलावंतांची पुढची पिढी कधी मोलमजुरी करते, कधी त्यांची मुले छोटे-मोठे फर्निचर तयार करून अगदी ओडीसा राज्यापर्यंत विक्री करतात. पण, आता या कार्यक्रमांना मागणीच कमी असल्याने ते हा वारसा पुढे चालवायला तयार नाहीत. त्यामुळे ही कला आमच्यासोबतच मरून जाईल, अशी दुखरी वेदना हे कलावंत व्यक्त करतात.