या व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ...काय आहे कारण

डिलेश्‍वर पंधराम
Sunday, 26 July 2020

तालुक्‍यातील गावागावांत कुंभार समाजाची वसाहत आहे. त्यांचा प्रमुख व्यवसाय मातीपासून जीवनोपयोगी वस्तू तयार करून विक्री करणे हा आहे. या साहित्यांच्या विक्रीतून ते संसाराचा गाडा पुढे रेटत असतात. परंतु, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आर्थिक चक्र फिस्कटले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. परिणामी, कुंभाराचा पारंपरिक व्यवसाय बुडाला असून, या समाजाला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

तालुक्‍यातील गावागावांत कुंभार समाजाची वसाहत आहे. त्यांचा प्रमुख व्यवसाय मातीपासून जीवनोपयोगी वस्तू तयार करून विक्री करणे हा आहे. देवी-देवतांच्या मातीच्या मूर्ती तयार करणे हेदेखील काम हा समाज करतो. या व्यवसायातून आलेल्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणे, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह असे कार्य ते पूर्ण करतात.

उन्हाळ्यात उष्णता अधिक राहात असल्याने मडके तयार करणे, सुरई, पैसे जमा करण्याचा मिनी बॅंक म्हणजे गल्ला तसेच विविध साहित्य तयार केले जातात. या साहित्यांच्या विक्रीतून ते संसाराचा गाडा पुढे रेटत असतात. परंतु, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आर्थिक चक्र फिस्कटले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कान्होबा, गणेश, लक्ष्मीच्या मूर्ती पुढे तयार केल्या जाणार आहेत. शासनाने सार्वजनिक मूर्तींची स्थापना करण्यास बंदी घातल्याने गणेश, दुर्गा, शारदा मूर्ती तयार करता येणार नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, अशी खंत समाजबांधवांनी व्यक्त केली.

सरकारने समस्या जाणून घ्याव्यात

कुंभार समाजाच्या वास्तविक समस्या सरकारने जाणून घेणे आवश्‍यक आहे. या समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक मदतीबरोबर माती सहज उपलब्ध होण्यासाठी परिपत्रक काढणे, काड्या (इंधन) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे वासुदेव पाठक, श्‍यामा पाठक, लक्ष्मण वरवाडे, सुरेश चौधरी, नरेश चौधरी, तानाजी बोरसरे, चेतराम बोरसरे, रघुनाथ बोरसरे, राजू पाठक, वामन बोरसरे, हेमराज बोरसरे, हरी कपाट यांनी केली आहे.

हेही वाचा : सांगा, याला रस्ता म्हणावा की चिखलाची वाट...या रस्त्याने कसा करावा प्रवास

 

आता घरघुती मूर्तीवरच निर्भर
सार्वजनिक सणासाठी लागणाऱ्या विविध मूर्ती तयार करण्यास बंदी घातली आहे. पण घराघरांत कान्होबा, लक्ष्मी, गणेश यांच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत.
- वामन वरवाडे.

मूर्तींची विक्री होणे आवश्‍यक
हिंदू सणाप्रमाणे मूर्ती तयार करीत आहोत. परंतु त्या मूर्तींची विक्री होणे आवश्‍यक आहे. तेव्हाच पोटाची खळगी भरणे थोडेफार सोपे होईल.
- केशव कपाट.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The traditional pottery business sank