कशी सुटणार वाडीतील वाहतूक कोंडी? पोलिसांचे लक्ष्य फक्त दुचाकी चालकांवरच 

विजय वानखेडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

वाडीतील काटोल बायपास वळन, सब्जी मंडी चौक, खडगाव वळन, एमआयडीसी टी पॉइंट, दत्तवाडीत चौक या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी रस्ते जाम होतात. बरेचदा 10 ते 15 मिनिटे रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. 

वाडी, (जि. नागपूर)  : नागपूरचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून ख्यात असलेल्या वाडीमध्ये मोठमोठी गोदामे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे वाहनतळ आहे. याचमुळे येथे दररोज हजारो वाहनांचे आवागमन असते. वाडीतील रस्ते चोवीस तासही सुरूच असतात. या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने स्थानिक नागरिकांना मात्र मन:स्ताप सहन करावा लागतो. याचशिवाय वाहतूक नियोजनबद्ध नसल्याने ट्रान्सपोटही त्रस्त आहेत. ही वाहतूक कोंडी कशी सुटणार असा सवाल वाडीतील नागरिक करू लागले आहेत. 

एक लाख लोकसंख्या असलेल्या वाडीमध्ये दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते. लगतच असलेली एमआयडीसी, आयुधनिर्माणी व वाडीत असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायामुळे वाहनांची दिवस-रात्र आवागमन सुरू असते. वाडीतील काटोल बायपास वळन, सब्जी मंडी चौक, खडगाव वळन, एमआयडीसी टी पॉइंट, दत्तवाडीत चौक या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी रस्ते जाम होतात. बरेचदा 10 ते 15 मिनिटे रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. 

तक्रार करूनही उपयोग नाही

खडगाव वळणावर तीनही बाजूने जाम झाल्याने विनाविलंब असलेल्या ऍम्बुलन्ससारख्या वाहनांनाही रस्ता मोकळा होईपर्यंत थांबावे लागते. तोपर्यंत आतील पेशंट दगावतो की काय?, अशी भीती नातेवाइकांनी अनेकदा बोलून दाखविली आहे. वाहतूक पोलिसाचे बल ही स्थिती नियंत्रणात आणण्यात अपुरी ठरत आहे. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही त्याचा काहीच उपयोग नाही असे मत आता नागरिक नोंदवू लागले आहेत. 

पोलिस ड्रंक अँड ड्राईव्ह मोहमेत व्यस्त

सायंकाळी पाचपर्यंत पोलिस वाडीतील विविध चौकाच्या एका भागात गटाने उभे राहून चालान बनविण्यात व्यस्त दिसतात. मात्र यानंतर ते दिसेनासे होतात. यावेळी ते वाहतूक व्यवस्थेला बाजूला सारून अंधारात लपून ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करून समाधान मानत आहेत असाही आरोप केला जात आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी अडचण झाली तरी पोलिस वेळेवर पोहचू शकत नाहीत. 

वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी

वाडीच्या रस्त्यावरील वाहतूक रामभरोसे असते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांना निवेदन देणार आहोत. 
- संजय अनासने, ट्रान्सपोर्ट व्यवसायी

 
आमचे प्रयत्न सुरू

सकाळी व सायंकाळी वडधामना परिसरातून जड वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे वाडीवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- संजय जाधव, ठाणेदार, वाहतूक विभाग वाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic congestion in wadi city