वा रे पठ्ठे! अधिकारात नसतानाही केले शिक्षकांचे स्थानांतरण...दोषी केंद्रप्रमुखावर जि. प. मेहेरबान

file photo
file photo

गोंदिया : महाराष्ट्र शासनाची ध्येय धोरणे राबविण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत करीत असते. शिवाय ध्येयधोरणे राबविताना काही अधिकाऱ्यांकडून चुका झाल्यास त्यांना शिक्षा देण्याचे कामसुद्धा जिल्हा परिषद करीत असते. परंतु, दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम गोंदिया जिल्हा परिषद येथे होत आहे.

सडक अर्जुनी तालुक्‍यातील डोंगरगावच्या केंद्रप्रमुखाने अधिकारकक्षात बसत नसतानादेखील शिक्षकांचे स्थानांतरण केले. चौकशीत केंद्रप्रमुख दोषी आढळला. शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित असतानादेखील अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्या केंद्रप्रमुखाला जिल्हा परिषद पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

सडक अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत डोंगरगाव सडक केंद्राचे केंद्रप्रमुख एम. पी. हुकरे यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसतानासुद्धा खुर्शीपार शाळेच्या शिक्षिका व्ही. सी. खंडाळे आणि सालेधरणी शाळेच्या शिक्षिका बी. डब्ल्यू. दिघोरे यांची आपल्या मनमर्जीने बदली केली. दरम्यान, केंद्रप्रमुख हुकरे यांना दोषी ठरवून पंचायत समिती सडक अर्जुनीने 12 फेब्रुवारी 2020 ला शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा ठराव घेऊन जिल्हा परिषद गोंदियाला पाठविला.

शिस्तभंगाची कारवाई का नाही

संबंधित प्रकरणात गटशिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांनीसुद्धा हुकरे दोषी असल्याचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला पाठविला. परंतु, संबंधित केंद्रप्रमुखावर अद्याप कार्यवाही झाली नाही. हुकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीने 18 जून 2020 ला घेतला होता. मात्र कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या केंद्रप्रमुखांचा बोलविता धनी कोण आहे? हे न उलगडणारे कोडे आहे.

चौकशी अहवालाला केराची टोपली

आदर्शाचे धडे देणारी जिल्हा परिषद गोंदियाच जर दोषींना पाठीशी घालत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद ही पंचायत समितीच्या ठरावाला व गटशिक्षणाधिकारी यांच्या चौकशी अहवालाला केराची टोपली दाखवत असेल; तर यापेक्षा गोंदिया जिल्ह्याचे दुसरे दुर्दैव कोणते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वेतनवाढ रोखूनही पदोन्नती

केंद्रप्रमुख हुकरे हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंपळगाव खांबी पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असताना एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवून एक वेतनवाढ कायमस्वरूपी थांबवून पुढील पदोन्नतीपासून अपात्र ठरविण्यात येत आहे, अशी मूळ सेवापुस्तिकेला नोंद आहे. असे असतानादेखील त्यांना केंद्रप्रमुखाची पदोन्नती का देण्यात आली? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांना पदोन्नती देण्यात कोणाकोणाचे खिसे गरम झाले? पदोन्नती देण्यात कोण कोण दोषी आहेत? याची जिल्हा परिषदेने चौकशी करून रॅकेटचा पर्दाफाश करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती गिरिधारी हत्तीमारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com