खंडाळा-येलदरी घाटात ट्रॅव्हल्स उलटली; दोन ठार, 19 प्रवासी जखमी

दिनकर गुल्हाने 
Wednesday, 21 October 2020

प्राप्त माहितीनुसार महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची पुणे-यवतमाळ बस (क्रमांक एम एच 29-82 22) ही पुसदकडे येत असताना खंडाळा घाटातील येलदरी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली.

पुसद (जि. यवतमाळ) : पुणे-यवतमाळ या महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसला आज बुधवारी (ता.21) सकाळी नऊला खंडाळा-येलदरी घाटात अपघात झाला. चालकाचे वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून दोन जण ठार झाले, तर 19 प्रवासी जखमी झाले. विवेक विनोद जाधव (वय 13, रा. रहाटी ता. दिग्रस जि. यवतमाळ) असे मृताचे नाव असून, घटनास्थळी मृत झालेल्या एका व्यक्तीचे नाव कळू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची पुणे-यवतमाळ बस (क्रमांक एम एच 29-82 22) ही पुसदकडे येत असताना खंडाळा घाटातील येलदरी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. मात्र, सागवृक्षामुळे खोल दरीत पडताना वाचली. घटनास्थळी 45वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरून बसचालक फरार झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पुसद शहरातील वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी शेख मसूद यांनी घटनास्थळी प्रथम धाव घेतली व व मदतकार्याला सुरुवात झाली. 

अपघाताची माहिती मिळताच पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी तीन रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविल्या. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यात आले. एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर प्रवासी विवेक विनोद जाधव याचा उपजिल्हा  रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी प्रवाशांची नावे

या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये गणेश साहेबराव जाधव (रा. यवतमाळ), दिलीप शंकर बहादुरे, रेखा दिलीप बहादुरे, नकुल नीलेश बहादुरे, रंजना नीलेश बहादुरे (सर्व रा. धामणगाव रेल्वे जि. अमरावती), अनिल शेकोराव चव्हाण (रा. पुणे), श्रीकांत माहुलकर (रा. वर्धा), सुभीबाई वसराम जाधव (रा. रहाटी ता. दिग्रस जि. यवतमाळ), अमोल चरण राठोड, गणेश साहेबराव राठोड, नीलेश गणेश डफडे (सर्व रा. कळसा), लक्ष्मी साहेबराव जाधव (रा. उमरखेड), रुपाली अमोल राऊत (रा. साळोद), निकिता दीपक काशिदे, सावन दीपक काशिदे, रूष दीपक काशिदे (रा. वाशीम), संदीप भीका राठोड (रा. आरंभी, ता. दिग्रस) यांचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: travels fall in valley at khandala yeldari in yavatmal district