बोंबला...! अख्खाच्या अख्खा ट्रकच रात्रीत झाला गायब

सिध्दार्थ गोसावी
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कोरपना तालूक्‍यातील वाळूघाटावर चोरांचा मोठाच वावर सुरू आहे. वाळू चोरांना महसूल विभाग पोटाशी घेत असल्याचा आरोप होत असतांना भरारी पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला.

कोरपना ( चंद्रपुर) : भरारी पथकाने दोन दिवसापुर्वी अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रक पकडला. जप्त केलेला ट्रक कार्यालय परिसरात उभा होता. मात्र सकाळी हा ट्रक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. मंडळ अधिकाऱ्यांनी चालक आणि मालका विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी शोध घेतला असता हा ट्रक आदिलाबाद येथील ट्रक मालकाच्या घरासमोर उभा होता. दरम्यान पोलीसांनी चालक नरेंद्र पड्डा यास ताब्यात घेतले असून मालक फरार असल्याची माहीती आहे.

कोरपना तालूक्‍यातील वाळूघाटावर चोरांचा मोठाच वावर सुरू आहे. वाळू चोरांना महसूल विभाग पोटाशी घेत असल्याचा आरोप होत असतांना भरारी पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. तहसिलदार महेंद्र वाकलेकर,मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी मारोती मडावी, प्रकाश कम्मलवार यांनी ट्रक जप्तीची कार्यवाही केली. जप्त केलेला ट्रक तहसिल कार्यालय परिसरात उभा होता. सकाळ तहसिल कर्मचारी कार्यालयात आले तेव्हा त्यांना ट्रक दिसला नाही. या गंभीर प्रकाराची तक्रार मंडळ अधिकार्ऱ्यांनी कोरपना पोलीस स्टेशनला केली. तक्रारीत ट्रक चालक आणि मालकावर संशय घेण्यात आला. ट्रकचा शोध घेणाऱ्या पोलीसांना आदिलाबाद येथे ट्रक असल्याचा सुगावा लागला. पोलीसांनी आदिलाबाद गाठले असता ट्रक मालकाच्या घरासमोरच ट्रक उभा होता. पोलीसांनी नरेंद्र पड्डा या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तर मालक फरार असल्याची माहीती आहे. ठाणेदार अरुण गुरनूले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

अवघ्या 12 तासात लागला शोध
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी TS01UC 1515 या क्रमांकाचा अवैध वाळू तस्करी करणारा ट्रक पकडला गेला, मात्र तहसील कार्यालयातून रात्रभरात हा ट्रक चोरी गेल्याने 25 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता पोलीस स्टेशन कोरपना येथे तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी क्षणांचा विलंब न करता ट्रक शोधण्याची मोहीम चालू करून 26 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता आदीलाबाद येथून ट्रक जप्त केला. अवघ्या 12 तासात पोलिसांनी ट्रक शोधून काढला आहे ट्रक जप्त करून ट्रकचा चालक आरोपी नरेंद्र कुमार पट्टा याला अटक करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck robbery from office in night