ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

मोताळा-नांदुरा मार्गावरील शेंबा परिसरातून सदर वाहन जात असताना, दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना शंका आली. त्यांनी बोराखेडी पोलिसांना माहिती दिली.

मोताळा (जि.बुलडाणा) : गोवंश जनावरांची कातडी वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेंबा येथे पकडले. त्यांच्या ताब्यातून 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करून शुक्रवारी (ता.15) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, ट्रक चालक रमेश बाळासाहेब शिंदे (31, रा. राजुरी जि. सोलापूर) व किन्नर ज्ञानेश्वर नानाभाऊ इंचाळ (25, रानेवायगाव जि. जालना) हे दोघे जण ट्रक क्रमांक एम.एच. 45 ए.एफ. 0155 या वाहनात गोवंश प्रजातीच्या जनावरांची कातडी घेऊन कलकत्त्याकडे जात होते. दरम्यान, मोताळा-नांदुरा मार्गावरील शेंबा परिसरातून सदर वाहन जात असताना, दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना शंका आली. त्यांनी बोराखेडी पोलिसांना माहिती दिली.

महत्त्वाची बातमी - अजितदादांच्या वरदहस्ताने तोंडदाबून बुक्यांचा मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

दरम्यान, पीआय माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे, एएसआय गजानन वाघ, पोहेकाँ मिलींद सोनोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक व किन्नरसह ट्रक पोलिस ठाण्यात आणून डिटेन केला. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, त्यांनी सदर ट्रकमध्ये मलकापूर व मोताळा येथून गोवंश जनावरांची कातडी घेऊन कलकत्त्याला जात असल्याचे सांगितले. 

हेही वाचा - विदारक : दिवसा रस्त्यावर तर रात्री ही लढाई; ‘कोरोना फायटर्स’चे छतही...

दरम्यान, पोलिसांनी ट्रकची पाहणी करून पंचनामा केला असता, त्यात अंदाजे 27 लाख रुपये किंमतीची 27 टन गोवंश जनावरांची कातडी व 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 37 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ट्रक चालक व किन्नर यांनी गोवंश जनावरांची कातडी अवैधरित्या व कोणत्याही रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असल्याचे माहीत असताना ताब्यात बाळगली. 

सोबतच दुर्गंधीयुक्त कातडीची वाहतूक करताना मिळून आले. तसेच जिल्हादंडाधिकारी यांच्या कोविड-19 या संसर्गजन्य आजारा संबंधी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार पीआय माधवराव गरुड यांनी बोराखेडी पोलिसांत दिली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपी ट्रक चालक रमेश बाळासाहेब शिंदे व किन्नर ज्ञानेश्वर नानाभाऊ इंचाळ (रा. रानेवायगाव जि. जालना) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पीआय गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे, पोकाँ संजय गोरे करीत आहेत.

दुर्गंधीमुळे मांस वाहतुकीची चर्चा
या ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने या ट्रकमधून मांसाची वाहतूक होत असावी, असा संशय नागरिकांना आला. त्यामुळे मांस वाहतूक करणारा ट्रक पकडल्याची चर्चा परिसरात जोमात होती. परंतु पोलिसांनी शुक्रवारी सदर ट्रकची पाहणी करून पंचनामा केला असता, यात गोवंश जनावरांची कातडी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मांस वाहतुकीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A truck transporting cow Leather was seized in buldana district