esakal | ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

null

ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : मोबाईल व्हॉट्स‌ॲपवर चॅटिंग करून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्यावर मालकी हक्‍क गाजवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यात आई आडवी आली असता तिलाही धक्‍काबुक्‍की करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार येथे घडला. या प्रकरणी पोलिसात तक्रार केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुशाल ऊर्फ रवींद्र कोहली, असे आरोपीचे नाव आहे. त्याने येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला. पहिल्यांदा त्यावर हाय पाठविला. मुलीने कोहलीचा डीपी पाहिल्याने मुलगा ओळखीचा वाटला. यातून चॅटिंग सुरू झाले आणि नाव सुद्धा कळले. दोन, चार दिवसांनी ड्रीम लॅंड सिटीमध्ये त्यांची पहिली भेट झाली. जीव एक दुसऱ्यात अडकला. भेटीगाठी सुरू झाल्या. कोहली मुलीला आपली हक्काची मालमत्ताच समजू लागला. त्याने तिला शिकवणी क्‍लास, डान्स क्‍लासला व घराबाहेर जाण्याला बंधने घालणे सुरू केले. वारंवार शिवीगाळसुद्धा करू लागला. यामुळे त्रस्त होऊन मुलीने त्याच्या सोबत बोलणे बंद केले. यामुळे कोहली चवताळला व त्याने मारून टाकण्याची धमकी देणे सुरू केले.

गुरुवारी (ता. २२) घरी आला व वडिलांनासुद्धा मारून टाकील, अशी धमकी दिली. शुक्रवारी त्याने पाठलाग करीत मुलीचे घर गाठले. घरात शिरून तिच्या अंगावर धावल्याने तिने आरडाओरड केली. आई धावत आली तर तिलासुद्धा ढकलून दिले. मुलीचे वडील आले व त्यांनी कोहलीला चापटा मारून हाकलून लावले. याची तक्रार येथील पोलिसात करण्यात आली. खुशाल ऊर्फ अवी कोहलीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

संपादन - विवेक मेतकर