खासगी बाजारात दोन लाख क्विंटल कापसाची उलाढाल, मात्र सीसीआयचे केंद्र कमीच

चेतन देशमुख
Sunday, 6 December 2020

शासन, पणन महासंघ व ‘सीसीआय’मार्फत शासकीय केंद्र सुरू करते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी रक्कम मिळू नये, हा या मागचा उद्देश आहे. मात्र ‘सीसीआय’ची केंद्र यंदा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस नाइलाजास्तव खासगी बाजारात विकण्याची वेळ आली आहे.

यवतमाळ : राज्य कापूस पणन महासंघ व ‘सीसीआय’च्या केंद्रांच्या तुलनेत खासगी बाजारातील कापूस खरेदीची उलाढाल तब्बल दोन लाख क्विंटलवर गेलेली आहे. जिल्ह्यात ‘सीसीआय’ने आतापर्यंत 84 हजार, तर पणन महासंघाने केवळ 31 हजार क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे. खासगी बाजारात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या कापसाची आवक मंदावल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, असे असले तरीदेखील येथील शेतकऱ्यांना अद्यापही हक्काची बाजारपेठ मिळालेली नाही. दरवर्षीच कापूस विकताना शेतकऱ्यांची दमछाक होते. कापसाचे सर्वाधिक उत्पादन यवतमाळ जिल्ह्यात होत असतानाही याच कापसाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. हमीभाव, शासकीय केंद्र, चुकारे यासाठी दरवर्षीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागतो.

अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

शासन, पणन महासंघ व ‘सीसीआय’मार्फत शासकीय केंद्र सुरू करते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी रक्कम मिळू नये, हा या मागचा उद्देश आहे. असे असले; तरी दरवर्षीच केंद्र उशिराने सुरू होत असल्याने शेतकऱ्यांची गोची होते. यंदा तर दरवर्षीपेक्षाही अधिक उशिराने केंद्र सुरू करण्यात आले. पणन महासंघाने मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण पुढे करून यवतमाळ विभागात तीनच केंद्र सुरू केलीत. अजूनही पुसद केंद्राबाबत निर्णय झालेला नाही.

खासगी बाजारात दर वाढणार

‘सीसीआय’चीही केंद्र यंदा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस नाइलाजास्तव खासगी बाजारात विकण्याची वेळ आली आहे. खासगीबाजारात कापसाचे दर समाधानकारक असल्याने खरेदी दोन लाख क्विंटलवर गेली आहे. खासगीच्या तुलनेत सीसीआयने 84 हजार, तर पणन महासंघाने 31 हजार 759 क्विंटल कापूस खरेदी केली आहे. खासगी बाजारात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत असून, बाजारात कापसाची आवक मंदावली आहे.

जाणून घ्या : सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरही धोक्यात; शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला

‘पणन’ला बाराशे शेतकऱ्यांची पसंती

जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या नोंदणीत शेतकऱ्यांची संख्या एक लाखावर गेलेली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात आणलेला नाही. एक लाख शेतकऱ्यांपैकी एक हजार 253 शेतकरी पणन महासंघाच्या केंद्रांवर पोहोचलेले आहेत. पणन महासंघाचे जिल्ह्यात तीन केंद्रांवर आठ जिनिंगवर खरेदी सुरू आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turnover of two lakh quintals of cotton in the private market