कुलसचिव पदासाठी वीस अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर डॉ. नीरज खटी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तांत्रिक कारण देत पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. यावरून विद्यापीठाने दुसऱ्याच दिवशी कुलसचिव पदासाठी नव्याने जाहिरात दिली. मात्र, 12 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पाच ऑक्‍टोबर शेवटचा दिवस असताना, 20 उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 7 सप्टेंबरला मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर लगेच नावाची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, चार दिवस उलटल्यावर नावाची घोषणा करण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. 12 सप्टेंबरला डॉ. नीरज खटींची निवड करण्यात आली. मात्र, कुलसचिव पदावर निवड झालेले डॉ. खटी काही महिन्यांपूर्वीच डी. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे (एलआयटी) रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले. त्यांनी "लिन'साठी विद्यापीठाकडे अर्ज केला. मात्र, त्यांचा "प्रोबेशन' कालावधी पूर्ण झाला नसल्याने त्यांना "लिन' देण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने कुलगुरूंच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी डॉ. खटी यांचा अर्ज फेटाळला. यातूनच डॉ. खटी यांनी कुलसचिव पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. या प्रकाराने विद्यापीठाला नव्याने जाहिरात द्यावी लागली. शुक्रवारपर्यंत (ता.5) यासाठी उमेदवारांना अर्ज करायचे होते. मात्र, 3 ऑक्‍टोबरपर्यंत अर्जच आले नसल्याचे चित्र होते. दरम्यान चार आणि पाच ऑक्‍टोबरदरम्यान 20 अर्ज आले आहे. त्यात प्रमुख दावेदार असलेले डॉ. संजय दुधे यांचासह दिग्गजांचे अर्ज आले आहेत. विद्यापीठाकडून आलेल्या अर्जातील नावाबद्दल गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र, डॉ. दुधे यांची निवड पक्की मानली जाते. त्यामुळे मुलाखत औपचारिकता ठरणार असल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या जाहिरातीपेक्षा यावेळी अर्जसंख्या कमी असल्याचे दिसत असल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
डॉ. खटी अपात्र
कुलसचिव पदासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेत आता पद स्वीकारण्यास नकार देणारे डॉ. नीरज खटी यांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळेच या पदासाठी डॉ. दुधे यांची निवड पक्की मानली जाते. मागच्या कुलसचिव पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत 23 अर्ज आले होते. त्यापैकी 8 उमेदवारांनी मुलाखत दिली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty applications for the post of Registrar