अमरावतीत निसर्गप्रेमींची निरंतर "जंगल बढाओ' मोहीम, तयार केले 21 हजार "सीडबॉल्स"

सुरेंद्र चापोरकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सामान्यपणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोकळ्या मैदानात किंवा कुठल्याही मोकळ्या जागी वृक्षलागवड यशस्वी होते. ते पाहता दरवर्षी पावसाळ्यात क्‍लबचे सदस्य एकत्रितपणे एखाद्या ठिकाणी जातात आणि त्याठिकाणी वृक्षारोपण करून परततात. विशेष म्हणजे ज्यांना या कामाची आवड आहे, त्यांनासुद्धा सोबतीला घेतले जाते. यंदा 23 हजार झाडांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

अमरावतीः  मानवाच्या निसर्गावरील आक्रमणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. केवळ कुठल्या प्रसंगाला वृक्षारोपण करून आपले काम संपले, अशी भावना सर्वसामान्यपणे समाजात पाहायला मिळते. मात्र अमरावतीच्या काही निसर्गप्रेमींनी निरंतर जंगल बढाओ मोहीम सुरू केली असून त्या अंतर्गत यंदा रिकाम्या शासकीय जागांवर, खुल्या निरुपयोगी मैदानांमध्ये विविध प्रजातींची झाडे लावली जाणार आहेत. सृष्टीसखा ग्रुपच्या या स्वयंसेवकांनी त्यासाठी 21 हजार "सीडबॉल्स'सुद्धा तयार केले आहेत.

सृष्टी सखाग्रुपच्या रश्‍मी नावंदर, प्रफुल्ल सावला, सुनीता राठी, शरद कासट, तुल कोल्हे, विशाल दरेकर, राजेश मित्तल आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हे अभियान सुरू केले आहे. सामान्यपणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोकळ्या मैदानात किंवा कुठल्याही मोकळ्या जागी वृक्षलागवड यशस्वी होते. ते पाहता दरवर्षी पावसाळ्यात क्‍लबचे सदस्य एकत्रितपणे एखाद्या ठिकाणी जातात आणि त्याठिकाणी वृक्षारोपण करून परततात. विशेष म्हणजे ज्यांना या कामाची आवड आहे, त्यांनासुद्धा सोबतीला घेतले जाते. यंदा 23 हजार झाडांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानात अर्हम युवा संघसुद्धा सहभागी झाले आहे. बेल, हिरडा, अमलतारा, पिंपळ, वड, आंबा, सीताफळ तसेच अन्य वनौषधींच्या रोपट्यांची निवड करण्यात येते. संस्थेने वनविभागाच्या साह्याने ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विभागांकडून कुठल्याही वृक्षारोपणाचे नियोजन नसल्याने हा पावसाळा रिकामा जाऊ नये, याची दक्षता घेत संस्थेच्या या निसर्गमित्रांनी स्वतःच 23 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

सविस्तर वाचा - पुरातत्त्व संशोधक डॉ. श्रीपाद चितळे यांचे निधन

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
नागरिकांनी त्यांच्या घरी असलेल्या फळांच्या बिया आम्हाला आणून द्याव्या. त्यापासून सीड बॉल्स तयार करण्यात येणार आहे. यंदा शासनाचे नियोजन नसल्याने आम्हीच पुढाकार घेत वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना किंवा बाहेरगावी जाताना आम्ही तयार केलेले सीडबॉल्स सोबत घ्यावे आणि मोकळ्या जागेत त्यांचे रोपण करावे, असे आवाहन रश्‍मी नावंदर यांनी केले.
 

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty one thousand seed balls by nature lovers in Amaravati