जुळ्या नवजात बालकांचा मृत्यू

भूपेश बारंगे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धावसा (हेटी) येथे तीन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या गर्भवतीने जन्म दिलेल्या दोन जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. शासनाच्या एवढ्या योजना असताना ही घटना घडल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धावसा (हेटी) येथे तीन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या गर्भवतीने जन्म दिलेल्या दोन जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. शासनाच्या एवढ्या योजना असताना ही घटना घडल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित महिला तीन दिवसांपूर्वी शौचासाठी गेली असता तिने एका बाळाला जन्म दिला. त्याचा तिथेच मृत्यू झाला. या मुलाला साडीच्या पदरात घेऊन ती घरी आली. यावेळी तिच्या पोटात दुसरे बाळ असल्याची तिला माहीत नव्हते. पहिल्या मुलाची नाळ कापणे शक्‍य होत नसल्याने तातडीने तिला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिच्या पोटात दुसरे मूल असल्याचे कळले. त्यानंतर महिलेवर उपचार करण्यात आले. येथे दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. मात्र, त्याचाही काही वेळातच मृत्यू झाला.
घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. त्यात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा दोघांचाही नित्यक्रम. पतीपत्नी दोघेही मोलमजुरी करणारे. घर आहे तेही पडके. घराच्या भिंती ताडपत्री लावलेल्या. या महिलेले रक्त तपासणीशिवाय कोणतेही उपचार केले नाही. कधीही सोनोग्राफी काढली नाही. त्यामुळे पोटात किती मुले आहेत, याची माहिती तिला नव्हती.
बालमृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या योजना आहेत. त्या घरोघरी पोहोचविण्याकरिता यंत्रणा आहे. पण, या यंत्रणेला हे घर दिसले नाही, याचीच खंत वाटत आहे.
यापूर्वीही दोन मुलांचा मृत्यू
धावसा (हेटी) येथील रोषणा राऊत या गर्भवती महिलेच्या आतापर्यंत चार प्रसूती झाल्या. यात जन्मत:च तिच्या चारही बाळांचा मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी नियोजित कालावधीपेक्षा कमी कालावधीत प्रसूती झाल्याने एका बाळाचा तर त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.
गर्भवती महिलेला गरज
आशा स्वयंसेविका सध्या संपावर असल्याने या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. या महिलेच्या प्रसूतीची माहिती मिळताच गावातील आशा स्वयंसेविका मदतीला धावून गेल्याचे महिलांनी सांगितले.

महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. पोटात दोन मुले असल्याची माहिती तिला नव्हती. एका मुलाला जन्म दिला. त्याचा नाळ तुटत नसल्याने तिला दवाखान्यात आणले. त्यानंतर तिची तपासणी केली असता दुसरे बाळ असल्याचे समजले. त्यावर उपचार करून त्याला जन्म दिला. काही वेळात त्याचा मृत्यू झाला.
- डॉ. स्मिता करनाके

स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twin infant deaths