माजी आमदारांसाठी राष्ट्रवादीचा स्टेज सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

मुंबईत आटोपली चर्चा; शरद पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देणारे माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्टेज सज्ज झाला आहे. पक्ष प्रवेशासाठी रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ओबीसी नेते छगणराव भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही आमदार व त्यांच्या समर्थकांमध्ये रविवारी सांगोपान चर्चा झाली.

 

विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमधील नाराजी नाट्य उफाळून आले. त्यामुळे दोन्ही माजी हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांच्यासह त्यांच्या राज्यभरातील २०० समर्थकांनी राजीनामा दिला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यच्या तयारीत आहे. त्यापूर्वी शरद पवार, जयंत पाटील आणि छगणराव भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भदे आणि सिरस्कार यांच्यासह नवनाथ पडळकर, अर्जुन सरलगर व त्यांचे राज्यभरातील समर्थक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामेश्‍वर पवळ यांच्यासह भदे, सिरस्कार, सलगर आणि पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी समर्थकांच्या काही मागण्या असल्याचे सांगून त्या बैठकीत मांडल्यात. त्यात ओबीसीची जातनिहाय जनगनगणा करणे, महिलांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देणे, धनगर, धोबी, कोळी, कुंभार या समाजाच्या आरक्षणाबाबतची मागणी, भटक्या विमुक्तांना व गरजू मुस्लिमांना घरकुल, जमिनी देणे आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबतच वेळोवेळी बैठका घेवून निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारच्या स्तरावरील मागण्यांसाठी पाठपुरावा करू, असे पवार यांनी सांगितले. त्यासाठी तुम्ही सोबत असणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगतिले. त्यावर दोन्ही माजी आमदारांनी कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून निर्णय घेवू, असे बैठकीत सांगतिले.

हवे राजकीय पुनर्वसन
माजी आमदार भदे, सिरस्कार व त्यांच्या समर्थकांना राजकीय पुनर्वसनाची हमी शरद पवार यांच्याकडून हवी होती. कार्यकर्त्यांना जिल्हा व राज्य कार्यकारिणीत पदे, महामंडळ व इतर समित्यांवर जागा कार्यकर्त्यांच्या सक्षतेनुसार देण्याचे आश्‍वासन दोन्ही आमदारांनी पवारांना मागितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Akola EX MLA now set for NCP