20 लाखांच्या गोमांससह दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर  : पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी जुनी कामठी हद्दीतील कोळसा टाल स्लॉटर हाऊस परिसरात छापा टाकून 20 लाखांच्या गोमांसासह दोघांना अटक केली. परिसरातून ट्रकसह तीन वाहनेही जप्त केली.

नागपूर  : पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी जुनी कामठी हद्दीतील कोळसा टाल स्लॉटर हाऊस परिसरात छापा टाकून 20 लाखांच्या गोमांसासह दोघांना अटक केली. परिसरातून ट्रकसह तीन वाहनेही जप्त केली.
मोहम्मद जावेद हबीब खान (31, रा. मदन चौक, कामठी) व इर्शाद अहमद प्यारे साहाब शेख (31, रा. चौधरी मशिदीजवळ, कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जावेद ट्रकचालक असून, गोमांस इतरत्र वाहून नेण्याचे काम करतो. परिमंडळ क्रमांक पाचचे पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्यासह पोलिस कर्मचारी विनोद सोनटक्के, सूरज भारती, चेतन जाधव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत, मृदुल नगरे शुक्रवारी सकाळी नॅशनल हायवेवरील जयस्तंभ परिसरातून गस्त घालत होते. त्याचवेळी कोळसा टाल स्लॉटर हाउस परिसरात पिकअप वाहनातून गोमांस आणून ट्रकमध्ये भरले जात असल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकाने पंचांसह छापा टाकला असता तिथे 5 ते 6 जण होते. पोलिसांना पाहताच सर्व पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करीत जावेद आणि इर्शादच्या मुसक्‍या आवळल्या. त्या ठिकाणी एक बाराचाकी ट्रक व दोन पिकअप वाहन आढळले. हा ट्रक जावेदच्या मालकीचा आहे. ट्रकच्या मागील भागात पाहणी केली असता आत सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 13 टन गोमांस आढळले. ट्रकजवळच उभ्या दोन्ही पिकअप वाहनात रक्तमिश्रित पाणी व बर्फ होता. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 41 लाख रुपये आहे. या प्रकरणात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम सुधारणा कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two arrested with a beef of 20 lakhs