दोन सहायक आयुक्तांकडे चार झोनचा कारभार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : विविध पुरस्कार पटकावणाऱ्या महापालिकेच्या दोन झोनमध्ये सहायक आयुक्तच नसल्याने इतर दोन झोनच्या सहायक आयुक्तांकडे कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही सहायक आयुक्तांची कोंडी होत असून चार झोनमधील दहा लाखांवर नागरिकांच्या समस्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. प्रभारी सहायक आयुक्तांना त्यांच्या झोनमध्ये तसेच अतिरिक्त प्रभार असलेल्या झोनमध्येही लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने "एक ना धड भाराभर चिंध्या' अशी त्यांची स्थिती झाली आहे.
महापालिकेच्या दहा झोनपैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली व नेहरूनगर या चार झोनमध्ये आतापर्यंत सहायक आयुक्त नव्हते. यापैकी धंतोली व नेहरूनगर झोनला नुकतेच सहायक आयुक्त मिळाले. परंतु, महापौरांच्या प्रभागाचा समावेश असलेल्या लक्ष्मीनगर तसेच धरमपेठ झोनमध्ये अद्यापही सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली नाही. लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे यांची बदली होऊन आता चार ते पाच महिने लोटले तर धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांची नियुक्ती स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली. धरमपेठ झोनमध्येही तीन महिन्यांपासून सहायक आयुक्त नाही. हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्याकडे लक्ष्मीनगर झोनचा तर सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्याकडे धरमपेठ झोनचा प्रभार देण्यात आला आहे. लक्ष्मीनगर व हनुमाननगर झोन तसेच सतरंजीपुरा व धरमपेठ झोन ही दोन टोकाला असलेली कार्यालये आहेत. त्यामुळे या दोन्ही सहायक आयुक्तांची चांगलीच कोंडी झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two Assistant Commissioners are incharge of four zones