
कळसूबाईचे शिखर सह्याद्री पर्वतावर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर उंचीवर आहे. त्यासाठी त्यांना सहा तासांचा कालावधी लागणार आहे. या चढाईची सुरुवात ते अहमदनगर जिल्ह्यातील बारी या ठिकाणावरून करणार आहेत.
कारंजा घाडगे (जि. वर्धा) : नवीन वर्षात अनेकांकडून काही ना काही संकल्प करण्यात येतो. असाच संकल्प राज्यातील ७० दिव्यांग बांधवांनी केला आहे. ते ३१ तारखेला सह्यांद्री पर्वतावरील कळसूबाई शिखर चढून नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. यात कारंजा येथील दोघांचा समावेश आहे.
कळसूबाई शिखर चढण्यासाठी जाणाऱ्या या चमूत ५८ पुरुषांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उमेश खापरे (रा. सेलगाव लवणे) व हरिभाऊ हिंगवे (रा. कारंजा) हे यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी उमेश खपरे ७० टक्के अपंगत्व तर हरिभाऊ हिंगवे यांना ४० टक्के अपंगत्व आहे. हरिभाऊ हिंगवे यांची येथील बसस्थानकाजवळ चहाटपरी आहे.
कळसूबाईचे शिखर सह्याद्री पर्वतावर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर उंचीवर आहे. त्यासाठी त्यांना सहा तासांचा कालावधी लागणार आहे. या चढाईची सुरुवात ते अहमदनगर जिल्ह्यातील बारी या ठिकाणावरून करणार आहेत. याचा सर्व खर्च ते स्वतः करणार आहेत. या साहसी कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांना या कार्यासाठी शिव ऊर्जा प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे यांचे सहकार्य लाभले आहे.
दिव्यांग बांधवांना कोणीही कमी लेखू नये
दिव्यांग बांधवांना कोणीही कमी लेखू नये यासाठी या अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत व्हावे हा उद्देश ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे.
- उमेश खापरे,
मोहिमेत सहभागी युवक, कारंजा (घाडगे)
संपादन - नीलेश डाखोरे