गणेश विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

कामठी/पचखेडी (जि. नागपूर): जिल्ह्यातील वेगवेगळ्या दोन घटनांत गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुणाल हरिभाऊ उमरेडकर (वय 19, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना) व गुलाब श्‍यामराव डंभारे (वय 53, रा. गोठणगाव, ता. कुही) असे मृताचे नावे आहेत.

कामठी/पचखेडी (जि. नागपूर): जिल्ह्यातील वेगवेगळ्या दोन घटनांत गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुणाल हरिभाऊ उमरेडकर (वय 19, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना) व गुलाब श्‍यामराव डंभारे (वय 53, रा. गोठणगाव, ता. कुही) असे मृताचे नावे आहेत.
मिलालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्‍याअंतर्गत राजलक्ष्मीनगर नाका नंबर चार कळमना येथील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कळमना मार्गावरील हॉटेल रिलॅक्‍स नजीकच्या चौपदरी रस्ता बांधकामासाठी खोदून ठेवलेल्या नाल्यात विसर्जन करायला जवळपास आठ तरुण खोल पाण्यात उतरले होते. त्यात मृत कुणाल उमरेडकर, शेख अजीब शेख शरीफ व शुभम ठेंबरे हे पाण्यात बुडायला लागले, दोघे बाहेर पडले मात्र कुणाल बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच ठाणेदार संतोष बाकल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कृणालला बाहेर काढून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याले. मात्र येथे त्यास मृत घोषित केले. कुणालच्या पश्‍चात आई, वडील, व दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे. कुणाल बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी होता.दुसरी घटना कुही तालुक्‍यातील गोठणगाव येथे घडली. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या गोठनगाव येथील गुलाब श्‍यामराव डंभारे हे गणेश विसर्जनाला गेले असता त्यांचा मरू नदीत पाय घसरल्याने मृत्यू झाला. गुलाब बुडल्याची माहिती मिळताच मरू नदीकाठावर एकच गर्दी जमली. वेलतूरचे ठाणेदार व पोलिसांच्या मदतीने गुलाब यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे संजय मेश्राम, भाजपचे सुनील जुवार, गोठनगावचे माजी सरपंच कैलास हुडमे यांनी मृताच्या कुटुंबीयांना भेट दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two drowned to death during Ganesh immersion