ठाकरेंवरील निष्ठा की प्रतापरावांबाबत खदखद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena

ठाकरेंवरील निष्ठा की प्रतापरावांबाबत खदखद

खामगाव - ऐंशी टक्‍के समाजकारण आणि वीस टक्‍के राजकारण हे ब्रीद घेवून राज्‍यात वाढलेल्‍या शिवसेनेत सध्या सत्‍ताकारणाचा बोलबाला असून, प्रत्‍येक जिल्‍ह्यात गटातटाच्‍या राजकारणाला उत आला आहे. याला बुलडाणा जिल्‍हा देखील अपवाद नसून, दोन आमदारांच्‍या पाठोपाठ आता खासदार जाधव यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्‍या सुरात सुर मिसळल्‍याने जिल्‍ह्यातील शिवसेना ही पुर्णतः शिंदे गटाच्‍या समर्थनात असल्‍याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, घाटाखालील शिवसैनिकांच्‍या मोठ्या गटाने खासदार जाधव यांच्‍याच विरोधात शड्डू ठोकला असून, आम्‍ही उध्दव ठाकरे यांच्‍याशीच एकनिष्ठ असल्‍याचे जाहीर केल्‍याने जिल्‍ह्यातील शिवसेनेत देखील दोन गट पडले आहेत.

जिल्‍ह्यातील शिवेसेनेचे आमदार संजय रायमुलकर व आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्‍या गटात सहभागी झाल्‍यानंतर जिल्‍हावासियांच्‍या नजरा खिळल्‍या होत्‍या त्‍या बुलडाणा जिल्‍ह्याचे खासदार तथा शिवेसेनेचे जिल्‍हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्‍यावर. परंतू, उशीरा का होईना त्‍यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्‍या सुरात सुर मिसळण्याचा निर्णय घेतला. त्‍यांचा हा निर्णय काही शिवसैनिकांना रुचला असेल तर काहींना नाही. परंतू, याबाबत जिल्‍ह्यात कोणीच उघड नाराजी व्‍यक्‍त केली नव्‍हती. तर घाटाखालील शिवसेनेचा विचार केला असता जिल्‍हाप्रमुख शांताराम दाणे यांनी शेगाव येथील पत्रकार परिषदेत सर्व शिवसैनिक खा. जाधव यांच्‍या समर्थनात असल्‍याचे जाहीर केले. परंतू, त्‍यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घाटाखाली शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव येथील काही शिवसेना पदाधिकारी यांनी अनुषांगीक पत्रकार परिषद घेत थेट खासदार जाधव यांच्‍या विरोधात शड्डू ठोकला असून, आम्‍ही उध्दव ठाकरे यांच्‍याशी एकनिष्ठ असल्‍याचे जाहीर केले.

परंतू, खासदार जाधव यांच्‍या विरोधातील या भूमिकेमुळे विविध प्रश्नांना वाव मिळत असून, खासदारांविरोधात उभा राहणारा हा गट खरचं ठाकरेंशी एकनिष्ठ आहे की, खासदारांनी निवडलेल्‍या वेगळ्या वाटेमुळे त्‍यांची वाट मोकळी झाली अशा व यासह अनेक प्रश्नांची राळ सध्या उठत आहे. कारण, सत्‍ता, पद, स्‍वतःचे राजकीय अस्‍तित्‍व यासाठी साधला जाणारा टोकाचा स्‍वार्थ, त्‍यासाठीची साठमारी, शह, काटशह, सफाईने सहकाऱ्यांचे गळे कापण्याची वृत्‍ती अशा सध्याच्‍या राजकीय परिस्‍थितीत कोणतीही शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: Two Group In Buldhana Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..