
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर सीमावर्ती भागातून दारूतस्करीला चांगलेच उधाण आले होते. विविध फंडे अवलंबत दिवसाढवळ्या होणारी दारूची तस्करी आचंबित करणारी होती.
शिंदोला (जि. यवतमाळ) : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सीमावर्ती भागातून सातत्याने दारूची तस्करी होत आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी नाकाबंदीदरम्यान एक ऑटो व दुचाकीची तपासणी शिरपूर पोलिसांनी केली. त्यावेळी त्यात देशी व विदेशी दारू आढळून आली. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन एक लाख ७५ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर खा शाबास खा पठाण (वय ३८, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) व राकेश भूपेंद्र रसाली (वय ३३, रा. नवीन वाघदरा, वणी) असे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर सीमावर्ती भागातून दारूतस्करीला चांगलेच उधाण आले होते. विविध फंडे अवलंबत दिवसाढवळ्या होणारी दारूची तस्करी आचंबित करणारी होती.
मागील काही दिवसांपासून दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी सकाळी नाकाबंदीदरम्यान ऑटो क्रमांक एम एच ४० पी १२४०मध्ये विदेशी दारूचे १४४ पव्वे किंमत २१ हजार ६०० व दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए क्यू ६१३० वरून वाहतूक करीत असलेली देशी दारूचे ७२ पव्वे किंमत तीन हजार ७४४ व दोन्ही वाहनांची किंमत एक लाख ५३ हजार ७४४ असा एकूण एक लाख ७५ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक गावंडे, प्रमोद जुणूनकार, सुगद दिवेकर, संजय खांडेकर, अमित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संपादन - नीलेश डाखोरे