दोघांनीही केले एकमेकांवर सपासप चाकुचे वार! आणि...

crime
crime
Updated on

कळंब (जि. यवतमाळ) : उसनवारीने घेतलेले पैसे वसुलीसाठी तगादा लावल्याने परस्परांवर केलेल्या चाकूहल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 22) पहाटे चारच्या दरम्यान कळंब येथील कोठा रोडवर असलेल्या गायकवाड यांच्या घरी घडली. दरम्यान, या दुहेरी खूनप्रकरणामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

विश्‍वजित प्रकाश बुरबुरे (वय 33, रा. तिरझडा, ता. कळंब) व वैभव उर्फ डोमा लक्ष्मण राऊत (वय 22, रा. बाभूळगाव, ह.मु.कळंब) अशी मृतांची नावे आहेत. कळंब येथील अशोक गायकवाड यांच्याकडे वैभव राऊत हा कामाला असून, उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विश्‍वजित पत्नी व दोन मुलांसह मुंबई येथील खासगी कंपनीत कामाला होता. कोरोनाच्या संकटात हाताला काम नसल्याने कुटुंबाला घेऊन तो तिरझडा या आपल्या मूळगावी आला होता. त्याने गायकवाड यांच्याकडून पैशांची उचल केली होती. यावेळी एक मित्र मध्यस्थ होता. लॉकडाउनच्या काळात हा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. पैसे वसुलीसाठी तगादा लावल्याने विश्‍वजितने बुधवारी पहाटे गायकवाड यांचा मुलगा राहत असलेले घर गाठले.

त्याच ठिकाणी वैभव राऊत झोपलेला होता. त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. दोघांची चांगलीच झटापट होऊन वैभवने विश्‍वजितवर प्रतिहल्ला चढविला. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. वैभव गंभीर जखमी झाल्याने आशीष गायकवाड, विवेक गायकवाड यांनी तत्काळ वैभवला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, विश्‍वजित रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, ठाणेदार विजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजू साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची तक्रार प्रकाश गोविंदराव बुरबुरे (वय 62, रा. तिरझडा) यांनी कळंब पोलिस ठाण्यात दिली. पैशांच्या वादातून खून झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कळंब पोलिस ठाण्यात मृत दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे तालुक्‍यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मालक समजून नोकरावर हल्ला
विश्‍वजितने आशीष गायकवाड यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. त्यांनी पैसे परतीसाठी तगादा लावला होता. त्यामुळे आपण गायकवाड यांचे पैसे परत करण्यासाठी कळंबला जातो, असे सांगून रात्री आठ वाजता दुचाकीने कळंबला आला होता. गायकवाड यांच्या घरी गेल्यावर मालक समजून नोकर वैभववरच हल्ला चढविला. जखमी अवस्थेत वैभवने प्रतिहल्ला केला. यातच दोघांनाही जीव गमवावा लागला.

मोबाईल ठेवला घरीच
विश्‍वजित घरून रात्रीच निघाला. त्याने दुचाकी एका ढाब्याजवळ ठेवली होती. ती पोलिसांना दिसली. मोबाईल घरीच ठेवल्याने कुटुंबीयांचा त्याच्या सोबत संपर्क होऊ शकला नाही. रात्रभर तो कुठे थांबला, हेदेखील कळू शकले नाही. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. त्यानंतरच नेमका उलगडा होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com