बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजणारे दोघे बडतर्फ, वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोघांना नोटीस

राजकुमार भितकर
Tuesday, 2 February 2021

अंगणवाडी सेविका यांचा कारवाईचा प्रस्ताव 'आयसीडीएस'कडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय प्रभारी वैद्यकीय अधिकारी महेश मनवर आणि भूषण मसराम यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

यवतमाळ : जिल्ह्यात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कापसी येथे पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गावातील 12 मुलांना पोलिओच्या जागी सॅनिटायझर पाजण्यात आले. याप्रकरणी आरोग्य विभागातील समुदाय अधिकारी, आशा वर्कर यांना बडतर्फ केले आहे. याशिवाय  अंगणवाडी सेविका यांचा कारवाईचा प्रस्ताव 'आयसीडीएस'कडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय प्रभारी वैद्यकीय अधिकारी महेश मनवर आणि भूषण मसराम यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा - शेतकरी मालामाल! लातुरातून घेतली माहिती अन् चंद्रपुरात केला प्रयोग, एकरी ६० ते ७० क्विंटल उत्पन्न

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी, ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना लस पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली आहे. ही सर्व मुले एक ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलटीचा त्रास झाल्याने पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे रात्रीच १२ बालकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. 

या घटनेची संपूर्ण चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अद्यापही करीत आहेत. मुलांना लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ डोस दिला. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. 

हेही वाचा - फडणवीसांचा सवाल; ‘अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न कसे करू?’, पीएफसाठी...

या बालकांना पाजले होते सॅनिटायझर - 
कापसी हे गाव घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते. गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम अशी सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two suspended in case of giving sanitizer instead of polio to children in yavatmal